Human vs Crocodile in Gujarat: चार तरूणांनी मगरीच्या जबड्यातून एका व्यक्तीला पुन्हा जिवंत आणलं; वडोदरा मधील थरारक घटना

त्याला एसएसजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

गुजरात (Gujrat) मधील वडोदरा (Vadodara) येथे एका व्यक्तीला मगरीच्या (Crocodile) जबडीतून परत आणण्यामध्ये यश आलं आहे. मनुष्य आणि प्राण्याच्या संघर्षाच्या कथांमधील ही एक अंगावर काटा आणणारी थरारक घटना समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार रविवारी रात्री विश्वमित्रा नदीवर ही घटना घडली आहे. यामध्ये हिंमत दाखवलेल्या काही पुरूषांच्या प्रयत्नाने एका व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे. मगरीच्या जबड्यातून परतलेल्या व्यक्तीचं नाव नरपत राठवा आहे. त्याला एसएसजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया कडून देण्यात आले आहे.

वाईडलाईफ अ‍ॅक्टिव्हिस्ट हेमंत वाधवान यांनी प्रसंगाचं वर्णन करताना राठवा हा पंचमहाल येथील हालोल चा रहिवासी असल्याचं सांगितलं. तो रात्री 11.30 च्या सुमारास Sayajigunj येथील Darshanam complex मधून नदीत उतरला. तेव्हा मगरीने झडप घातली. त्याचे दोन्ही पाय मगरीच्या जबड्यात अडकले. नदीमध्ये उतरला तेव्हा राठवा हा मद्यपान केलेल्या अवस्थेत असावा असा अंदाज आहे. एका महिलेने त्याचा आवाज ऐकला. त्यानंतर आजूबाजूचे 4 तरूण धावले. त्यांनी मगरीवर दगडफेक केली. मग घाबरलेल्या मगरीने नदीच्या दुसर्‍या काठावर राठवाला नेले. मग ते तरूणही पाठोपाठ गेले. या मार्गात 6-7 मगरींचा वास असतो असा अंदाज आहे. नक्की वाचा: अबब...ठाण्यातील सूजर वॉटर पार्कमध्ये आढळली चक्क 7 फूट लांब मगर, पहा व्हिडिओ .

काळोख्या रात्रीमध्ये मगरीचा असा पाठलाग जीवघेणा प्रवास असतो. पण राठवा याला वाचवण्यासाठी तरूणांनी प्रचंड धैर्य दाखवले. ब्रीजचा वापर करून ते नदीच्या दुसर्‍या काठावर गेले. सुमारे 25 मिनिटांच्या झटापटीनंतर मगरीने त्याचे पाय सोडले आणि ती पाण्यात गेली. हा सारा प्रकार अनुभवल्यानंतर राठवा पुढील काही काळ थरथरत होता. सुदैवाने त्याला तातडीने तरूणांनी एसएसजी रूग्णालयामध्ये नेले. त्याच्या पायांवर खोल घाव आहेत.