HP-99-9999: स्कूटीच्या VIP नंबरसाठी लावली तब्बल 1.12 कोटींची बोली; मुख्यमंत्री Sukhvinder Singh Sukhu यांनी मागवला तपशील

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी परिवहन विभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी संचालकांकडून बोलीचा तपशील मागवला आहे.

Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu (Photo Credit: ANI)

हिमाचल प्रदेशमधून (Himachal Pradesh) गाडीच्या नंबरप्लेटबाबत (VIP Number Plate) एक विचित्र घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका वाहनाच्या नंबरसाठी 1 कोटींहून अधिकची बोली लावण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (16 फेब्रुवारी) सांगितले की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सुरू असलेल्या ई-लिलावादरम्यान नोंदणी क्रमांक HP 99-9999 साठी 1.2 कोटी रुपयांची बोली प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा नंबर घेण्यासाठी राखीव किंमत 1000 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यासाठी 26 जणांनी अर्ज केले होते.

आता माहिती मिळत आहे की, देशराज नावाच्या व्यक्तीने सिमला जिल्ह्यातील कोटखाई उपविभागात आपल्या स्कूटीसाठी हा व्हिआयपी क्रमांक मिळवण्यासाठी 1,12,15,500 रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. दुसऱ्या क्रमांकावर, संजय कुमारने त्याच्या कारसाठी हा नंबर घेण्यासाठी 1,11,000,00 रुपये, धरमवीरने त्याच क्रमांकासाठी त्याच्या स्कूटीसाठी 1,000,550 रुपयांची बोली लावली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता पोर्टल बंद झाले. या क्रमांकासाठी एकूण 26 जणांनी बोली लावली आहे.

सर्वाधिक बोली लावणाऱ्याला पैसे जमा करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्याला तो क्रमांक दिला जाईल. बोली लावणाऱ्याने क्रमांक घेण्यास नकार दिल्यास दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक बोली लावणाऱ्याला आणि त्यानंतर तिसऱ्याला प्रत्येकी तीन दिवसांचा वेळ दिला जाईल. तिघांनीही नकार दिल्यास बोली रद्द केली जाईल. या व्हीआयपी क्रमांकासाठी एक कोटींहून अधिक तीन बोली लागल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हीव्हीआयपी क्रमांक मिळविण्यासाठी एक हजाराची रक्कम आगाऊ जमा करावी लागते.

हिमाचलमधील कोणतीही व्यक्ती या नंबरसाठी ऑनलाइन बोलीमध्ये भाग घेऊ शकत होती. वाहनांच्या नोंदणीसाठी कोटखई येथील वाहन नोंदणी कार्यालयात कोट्यवधी रुपयांची बोली लागल्यानंतर शासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. आता प्रतीक्षा आहे की सर्वाधिक बोली लावणारा देशराज लिलावाची पूर्ण रक्कम वाहन नोंदणी शाखेत केव्हा जमा करेल. ही रक्कम इतकी मोठी असल्याने पोलीस, सरकारी गुप्तचर आणि आयकर विभाग वाहन नोंदणीच्या कोटखई आणि जुब्बल शाखेच्या संपर्कात आहेत. गुरुवारी लिलावाची माहिती व्हायरल झाल्यानंतर सरकारी यंत्रणेने लिलावात सहभागी झालेल्या सर्व बोलीदारांचे रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली असल्याचे सूत्रांकडून समजते. (हेही वाचा: रेल्वे अधिकाऱ्याच्या मुलीचे हरवलेले बूट शोधण्यासाठी चक्क GRP, RPF आणि IRCTC कामाला; महिन्याभरात लागला शोध)

ऑनलाइन लिलावाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी परिवहन विभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी संचालकांकडून बोलीचा तपशील मागवला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी मनजीत शर्मा म्हणाले, ‘फॅन्सी नंबरसाठी बोली प्रक्रिया अद्याप सुरू आहे.’