गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा! केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकास 15 ऑगस्ट 2022 पर्यंत घर उपलब्ध करुन देईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत (Ujjwala Scheme) 13 कोटीहून अधिक गरीब कुटुंबांना एलपीजी सिलिंडर प्रदान केले आहेत

Amit Shah during interview (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकास घर देईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी व्यक्त केला आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील शिलज येथे एक किमी लांबीच्या ओव्हरब्रिजच्या आभासी उद्घाटन प्रसंगी अमित शहा बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मोदी सरकार ग्रामीण व शहरी भागात गृहनिर्माण प्रकल्प चालवित आहे. म्हणून मला खात्री आहे की 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येकाला घर प्राप्त होईल.

शाह यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अहमदाबादच्या थलतेज-शिलज भागात रेल्वे रुळावरील ओव्हरब्रिजचे उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल ओव्हरब्रिज साइटवर उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत 10 कोटीहून अधिक परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत (Ujjwala Scheme) 13 कोटीहून अधिक गरीब कुटुंबांना एलपीजी सिलिंडर प्रदान केले आहेत. आमच्या सरकारने देशातील सर्व खेड्यामध्ये वीजपुरवठा आणला आहे. आता आम्ही 2022 पर्यंत देशातील प्रत्येक घरात पाण्याची कनेक्टिव्हीटी आणण्याचे काम करत आहोत. (हेही वाचा: Covid-19 Vaccination in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार कोविड-19 लस- Reports)

गृहमंत्री शहा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे एक लाख रेल्वे क्रॉसिंग संपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत आम्ही ओव्हरब्रिज किंवा अंडरब्रिज बांधण्याचे काम केले असून, यामध्ये राज्य सरकारबरोबर 50-50 टक्के खर्च भागविला जातो.  देशातील मानवरहित रेल्वेमार्ग हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी अपेक्षा आहे की 2022 पर्यंत देशात एकही मानवरहित रेल्वेमार्ग असणार नाही.