Air India महिला वैमानिकांनी रचला इतिहास; उत्तर ध्रुवावरून उड्डाण करून जगातील सर्वात लांब फ्लाईट अमेरिकेवरून पोहोचली बंगळूरूला, सोशल मिडियावर कौतुकाचा वर्षाव

कॅप्टन झोया अग्रवाल या ऐतिहासिक विमानाचे नेतृत्व करीत होती. झोयाबरोबर कॅप्टन पापागरी तन्मई, कॅप्टन शिवानी आणि कॅप्टन आकांक्षा सोनवरे होते

All-Women Air India Pilot (Photo Credits: @ANI/ Twitter)

भारतीय महिला अनेक गोष्टींद्वारे जगभरात आपल्या देशाचा अभिमान वाढवत आहेत. आता भारतीय महिला वैमानिकांनीही आपली शक्ती दाखवत जगाला सांगितले आहे की त्या कोणापेक्षा कमी नाहीत. एअर इंडियाच्या 4 महिला वैमानिकांनी (Air India Pilot) इतिहास घडविला आहे. एअर इंडियाच्या चार महिला वैमानिकांनी चालविलेली सर्वात मोठी थेट फ्लाईट (Longest Flight) अमेरिकेहून (US) बेंगळुरू (Bengaluru) विमानतळावर उतरली आहे. रविवारी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) इथून उड्डाण घेतलेले हे विमान उत्तर ध्रुवावरुन (North Pole) प्रवास करून सोमवारी सकाळी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळूरू येथे पोहोचले. हा प्रवास सुमारे 16 हजार किलोमीटरचा होता.

ही यासाठी देखील एक मोठी गोष्ट आहे कारण उत्तर ध्रुवावरून विमाणाचे उड्डाण करणे फार अवघड आहे. त्यामुळे विमान वाहतूक कंपन्या या मार्गावर अनुभवी पायलटनाच पाठवतात. एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाईट क्रमांक एआय-176 शनिवारी रात्री साडेआठ वाजता सॅन फ्रान्सिस्को सुटले होते. शनिवारी एअर इंडिया एअरलाइन्सने सांगितले की, हे कोणत्याही भारतीय एअरलाइन्सद्वारे चालविण्यात येणारे सर्वात लांब व्यावसायिक उड्डाण असेल. वाऱ्याच्या वेगानुसार यासाठी 17 तासांहून अधिक वेळ लागेल असे वर्तवण्यात आले होते. जगाच्या विरुद्ध टोकाला असलेल्या या दोन शहरांमधील अंतर 13,993 किलोमीटर आहे आणि दोन्ही शहरांच्या वेळेत 13.5 तासांचा फरक आहे. (हेही वाचा: CSMT-Delhi सुपरफास्ट वन वे स्पेशल ट्रेन आज मध्य रेल्वेवर धावणार; इथे पहा थांबे, बुकिंग डिटेल्स)

हे विमान उत्तर ध्रुवावरून अटलांटिक मार्गाने बेंगळुरू विमानतळावर पोहोचले आहे. कॅप्टन झोया अग्रवाल या ऐतिहासिक विमानाचे नेतृत्व करीत होती. झोयाबरोबर कॅप्टन पापागरी तन्मई, कॅप्टन शिवानी आणि कॅप्टन आकांक्षा सोनवरे होते. याबाबत एअर इंडियाने ट्विट केले आहे की, 'वेलकम होम, तुमच्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. यासह आम्ही एआय 176 च्या प्रवाशांचे अभिनंदन करतो, जे या ऐतिहासिक प्रवासाचा हिस्सा बनले.' केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनीही महिला वैमानिकांचे अभिनंदन करत ट्विट केले आहे.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन महिला वैमानिकांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. यासह हे विमान बेन्ग्लोरे येथे पोहोचल्याचे समजताच सोशल मिडियावरही या महिला वैमानिकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.