Henley Passport Index 2022: जपान आणि सिंगापूरचा पासपोर्ट ठरला जगात सर्वात शक्तिशाली; जाणून घ्या भारताची स्थिती
यामध्ये उत्तर कोरिया 104 व्या क्रमांकावर आहे, जिथे पासपोर्ट धारक केवळ 39 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात. त्याचबरोबर नेपाळ आणि पॅलेस्टाईनचे लोक 37 देशांना भेट देऊ शकतात आणि हे दोन्ही देश 105 व्या क्रमांकावर आहेत
जगात काही देश आहेत ज्यांचे पासपोर्ट (Passport) हे सर्वात शक्तिशाली मानले जातात, तर काही देश असे आहेत ज्यांचे पासपोर्ट सर्वात कमकुवत मानले जातात. आता 2022 मधील अशा पासपोर्टची क्रमवारी समोर आली आहे. पासपोर्ट स्वातंत्र्याबाबत इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) द्वारे प्रदान केलेल्या विशिष्ट डेटावर आधारित, हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने 2022 (Henley Passport Index 2022) वर्षाची क्रमवारी जाहीर केली आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2006 पासून दरवर्षी पासपोर्ट रँकिंग जारी करत आहे, जे जगातील सर्वात जास्त स्वतंत्र पासपोर्ट कोणत्या देशात आहेत हे दर्शविते.
गेल्या 16 वर्षांमधील मागील दोन वर्षांत, कोविड महामारीमुळे पासपोर्ट रँकिंग अधिक महत्त्वाचे बनले आहे. मात्र, कोविड महामारीमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांचा पासपोर्टच्या क्रमवारीत समावेश करण्यात आलेला नाही. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2022 च्या अहवालात 192 देशांमध्ये, जपान आणि सिंगापूरला पहिले स्थान देण्यात आले आहे. या देशातील पासपोर्ट धारक तब्बल 192 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात.
अहवालात असे दिसून आले आहे की, दक्षिण कोरिया आणि जर्मनीमधील लोक जगातील 190 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात, त्यामुळे हे दोन देश दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग आणि स्पेन हे सर्व देश तिसऱ्या स्थानावर आहेत. या सर्व देशांतील लोक जगातील 189 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. फ्रान्स, नेदरलँड्स, स्वीडन, ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क चौथ्या स्थानावर आहेत. या देशातील लोक 188 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतात. अशाप्रकारे युरोपियन युनियन देश, नेहमीप्रमाणे अव्वल स्थानावर आहेत.
हेन्ली पासपोर्ट निर्देशांकात आयर्लंड आणि पोर्तुगाल पाचव्या क्रमांकावर आहेत. त्याच वेळी, युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडम, जे 2014 मध्ये एकत्रितपणे अव्वल स्थानावर होते, त्यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे आणि 2022 च्या क्रमवारीत ते 6 व्या स्थानावर आहेत. अमेरिका आणि ब्रिटनसह स्वित्झर्लंड, नॉर्वे, बेल्जियम आणि न्यूझीलंड हे देशही सहाव्या क्रमांकावर आहेत. यासोबतच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, ग्रीस, माल्टा हे देशही टॉप-10 मध्ये सातव्या क्रमांकावर आहेत, तर हंगेरी आणि पोलंड आठव्या क्रमांकावर आहेत. (हेही वाचा: PM Narendra Modi यांच्या हस्ते आज 25 व्या National Youth Festival चा शुभारंभ, तमिळनाडूला मिळणार 11 नवी मेडिकल कॉलेज)
हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने जगातील सर्वात कमजोर पासपोर्टची क्रमवारीही जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर कोरिया 104 व्या क्रमांकावर आहे, जिथे पासपोर्ट धारक केवळ 39 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात. त्याचबरोबर नेपाळ आणि पॅलेस्टाईनचे लोक 37 देशांना भेट देऊ शकतात आणि हे दोन्ही देश 105 व्या क्रमांकावर आहेत. त्याच वेळी, सोमालिया 106 व्या आणि येमेन 107 व्या क्रमांकावर आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानची परिस्थिती येमेन आणि सोमालियाहूनही वाईट आहे. पाकिस्तानी पासपोर्ट 108 व्या क्रमांकावर आहे आणि पाकिस्तानी नागरिक त्यांच्या पासपोर्टसह केवळ 31 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. त्याचबरोबर सीरिया 109 व्या, इराक 110 आणि अफगाणिस्तान 111 व्या क्रमांकावर आहे.
2021 च्या तुलनेत 2022 च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या पासपोर्ट क्षमतेत सुधारणा झाली आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये तो गेल्या वर्षीच्या 90 व्या क्रमांकावरून आता 83 व्या क्रमांकावर आहे. मात्र, 2020 मध्ये, भारतीय पासपोर्ट 84 व्या क्रमांकावर होता. अहवालानुसार, भारतीय पासपोर्टधारक जगातील 60 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. 2006 पासून, भारताने व्हिसा मुक्त यादीत आणखी 35 देश जोडले आहेत.