Hathras Case: हाथरस प्रकरणी दिल्लीच्या जंतर मंतर येथे निषेध; CM Arvind Kejriwal, चंद्रशेखर आझाद, स्वरा भास्करही आंदोलनात सामील  

लोक विविध मार्गांनी या घटनेचा निषेध करत आहेत. आता शुक्रवारी सायंकाळी दिल्लीतील (Delhi) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) शेकडो लोक हाथरस प्रकरणाच्या निषेधासाठी जमले आहे.

Arvind Kejriwal joins Jantar Mantar protest | (Photo Credits: ANI)

हाथरस बलात्कार प्रकरणी (Hathras Incident) सध्या संपूर्ण देशात रोष पसरला आहे. लोक विविध मार्गांनी या घटनेचा निषेध करत आहेत. आता शुक्रवारी सायंकाळी दिल्लीतील (Delhi) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) शेकडो लोक हाथरस प्रकरणाच्या निषेधासाठी जमले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनीही येथे हजेरी लावली. सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि माकपचे नेते डी. राजा यांनीही इथे हजेरी लावली आहे. यासह आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज, जिग्नेश मेवाणी आणि बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर याशिवाय भीमा आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद देखील या ठिकाणी पोहोचले आहेत.

यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की हाथरस प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी. ते म्हणाले, ‘या विषयावर कोणतेही राजकारण होऊ नये. यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, मुंबई किंवा दिल्लीमध्ये अशी घटना का घडावी? देशात बलात्काराच्या घटना घडू नयेत. संपूर्ण देशाची अशी इच्छा आहे की दोषींना कडक शिक्षा व्हावी. यावेळी पीडितेच्या कुटूंबास शक्य तितक्या मदतीची आवश्यकता आहे. आम्ही दु: खाच्या वेळी येथे जमलो आहोत, भगवंताला प्रार्थना आहे की, तो आमच्या मुलीच्या आत्म्यास शांती देओ.’

मुख्यमंत्री झाल्यानंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदा निषेधार्थ सामील झाले. हे प्रदर्शन प्रथम इंडिया गेट येथे होणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी इंडिया गेटच्या भोवताल कलम 144 लागू केल्यानंतर निषेध स्थळ बदलण्यात आले. जंतर-मंतर येथील वाढती गर्दी पाहता जनपथ मेट्रो स्थानकातील प्रवेश आणि निर्गमन बंद करण्यात आले आहे. राजीव चौक, पटेल चौकातील एक्झिट गेटही बंद करण्यात आला आहे. (हेही वाचा: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावेच'; दिल्लीतील इंडिया गेट येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या वेळी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मागणी)

दुसरीकडे हाथरस प्रकरणाबाबत पिडीत मुलीच्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी यूपी पोलिसांनी रोखल्यानंतर, यांनी आता दिल्लीतील वाल्मिकी मंदिर गाठले. शुक्रवारी कॉंग्रेसने वाल्मिकी मंदिरामध्ये प्रार्थना सभेत भाग घेतला.