Har Ghar Tiranga Abhiyan: महाराष्ट्रात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवले जाणार 'हर घर तिरंगा’ अभियान; विविध कार्यक्रमांचे आयोजन

यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबवून आघाडी घेतली.

Tiranga | (Photo Credit harghartiranga)

गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा म्हणजेच ‘हर घर तिरंगा’ मोहीम (Har Ghar Tiranga Abhiyan) राबविण्यात येणार आहे. याबाबत शनिवारी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी, जनतेने एकजूट होऊन या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. येत्या 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभिमानाने फडकावा, असे आवाहन त्यांनी केले. 'हर घर तिरंगा' ही 'आझादी के अमृत' उत्सवाअंतर्गत चालवली जाणारी मोहीम आहे, जी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ लोकांना त्यांच्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी प्रोत्साहित करते

'हर घर तिरंगा' मोहीम गेल्या दोन वर्षांपासून एक यशस्वी मोहीम मानली जात आहे. खेड्यांपासून शहरांपर्यंत, देशभरातील लोक त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर तिरंगा फडकावून स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा करतात. देशभरात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यानेही पूर्ण तयारी केली असून, राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र विविध उपक्रमांनी हे अभियान साजरे केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिली. (हेही वाचा: NCERT ने पाठ्यपुस्तक प्रस्तावना काढून टाकल्याचा दावा फेटाळून लावला)

केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा अभियान सुरु केले. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबवून आघाडी घेतली. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत.

प्रत्येक नागरिकाने घरावर तिरंगा ध्वज दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत फडकवावा, यासाठी त्यांना राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. राज्यभरात विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तसेच राज्यस्तरावरही यानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.