Gujarat High Court: पोलीस अधिकाऱ्याने कोर्टात प्यायले कोल्ड्रड्रिंक; न्यायाधीशांनी ठोठावली शिक्षा
नेमकी ही घटना कॅमेऱ्यात न्यायाधीशांच्या नजरेस पडली. न्यायाधीशांनी या घटनेची दखल घेतली आणि लागलीच या पोलीस अधिकाऱ्याला शिक्षाही सुनावली.
कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) सुनावणी सुरु असताना एक पोलीस अधिकारी कोल्ड्रड्रिंक पिताना आढळून आला. नेमकी ही घटना कॅमेऱ्यात न्यायाधीशांच्या नजरेस पडली. न्यायाधीशांनी या घटनेची दखल घेतली आणि लागलीच या पोलीस अधिकाऱ्याला शिक्षाही सुनावली. ही मजेशीर शिक्षा ऐकल्यावर आपल्यालाही कदाचीत गंमत वाटू शकेल. हा मजेशीर प्रसंग गुजरात उच्च न्यायालयात (High Court of Gujarat) एका सुनावणीदरम्यान घडला. या मजेशीर शिक्षेची कोर्ट परीसरात आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
घडले असे की, गुजरातमध्ये वाहतूक नियंत्रक पदावरुन कर्तव्य बजावत असताना एका चौकात इन्स्पेक्टर ए. एम. राठोड यांनी दोन महिलांना मारहाण केल्याची कथीत घटना घडली होती. हे प्रकरण न्यायालयात आले होते. मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार आणि न्या. अशुतोष जे. शास्त्री यांच्या खंडपीठासमोर या खटल्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी सुरु होती. सुनावणी सुरु असताना आणि तसेच न्यायालय आवारात वावरताना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. काही संकेतही पाळावे लागतात. असे असताना सुनावणी दरम्यान पोलीस इन्स्पेक्टर राठोड कॅमेरॅसमोरच ड्रिंक्स घेताना दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच न्यायाधीशांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक (एजीपी) डी. एम. देवयानी यांच्याकडे विचारणा केली की, तुमच्या अधिकाऱ्यानं असं वागणं योग्य आहे का? (हेही वाचा, Snake Found in High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये आढळला साप)
न्यायालयात या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न घेता प्रत्यक्ष घेतली असती तर हा अधिकारी अशा प्रकारे कोका कोलाचे कॅन घेऊन आला असता का? असा सवालही कोर्टाने विचारला. कोर्ट चिडल्याचे लक्षात येताच एजीपी देवयानी यांनी खंडपीठाची माफी मागितली. या वेळी कोर्टाने म्हटले की, संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कॅनमधून कोका कोला पिला असे दिसले तरी त्याने नक्की काय प्राशन केले हे समजू शकले नाही.
घडल्या प्रकाराबद्दल कोर्टाने शिक्षा ठोठावली की, आता आपण चुक केली आहे तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे संबंधीत पोलीस अधिकाऱ्याने कोर्टात कोका कोलाच्या १०० कॅन वाटावेत असे आदेश दिले. दरम्यान, कोर्टाने या पूर्वीच्या एका खटल्याचाही संदर्भ दिला. एकदा ऑनलाईन सुनावणी दरम्यान एक वकील कोर्टाला समोसा खाताना दिसला. कोर्टाचा समोसा खाण्यास विरोध अथवा आक्षेप नाही. परंतू, असे केल्याने इतरांच्या तोंडाला पाणी सुटू शकते. तसेच, औचित्यभंगही होऊ शकतो. त्यामुळे स्थळ, काळाचे भान ठेऊनच वर्तन व्हायला हवे.