Gujarat: तब्बल 113 दिवसानंतर कोरोना विषाणूवर मात, अहमदाबाद येथे 59 वर्षीय व्यक्तीला डिस्चार्ज; मोडला माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोलंकी यांचा विक्रम

आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी देवेंद्रभाई परमार यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) दहशत माजवली आहे. साधारणतः 10 ते 14 दिवसांमध्ये हा आजार बरा होऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे कोरोनाचा उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीला यातून बरे होण्यासाठी तब्बल 113 दिवस लागले आहे. पंचमहल येथील देवेंद्रभाई परमार यांच्यावर गेल्या 113 दिवसांपासून सोला सिव्हिल हॉस्पिटल, अहमदाबाद येथे कोरोनाचे उपचार चालू होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी देवेंद्रभाई परमार यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पटेल यांनी, परमार हे कदाचित देशातील सर्वात जास्त काळ कोरोनाचा उपचार घेणारे रुग्ण असतील असे म्हटले.

देवेंद्रभाई परमार यांनी कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोलंकी यांचा विक्रम मोडला आहे. भरतसिंह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अहमदाबादच्या सिम्स रुग्णालयात त्यांच्यावर 101 दिवस उपचार सुरू होते. देवेंद्र परमार यांना 28 ऑगस्ट रोजी कालका येथून रेफर केले गेले होते. त्यानंतर अहमदाबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरु झाले, यापैकी 90 दिवस ते आयसीयुमध्ये होते.

देवेंद्र परमार यांची पत्नी इंदू परमार यादेखील आरोग्य सेवेशी संबंधित आहेत आणि त्यांना कोरोनाचे गांभीर्य माहित होते. देवेंद्र परमार यांची फुफ्फुसे फारच कमकुवत झाली होती. एक वेळ अशी होती जेव्हा त्यांना 75 लिटर ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. अखेरीस, देवेंद्र परमार यांची प्रकृती हळू हळू सुधारू लागली आणि आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. देवेंद्र परमार यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार केले असते तर त्यासाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च आला असता. परंतु परमार यांच्यावर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले. (हेही वाचा: रशियामध्ये भारतीय बनवटीचे Sputnik V चे सॅम्पल टेस्ट साठी सज्ज; देशात 2021 पर्यंत तयार होणार 300 मिलियन डोस)

दरम्यान, नितीन पटेल यांनी सांगितले की, आतापर्यंत सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 450 लसी देण्यात आल्या असून त्यापैकी एकाही व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम झाला नाही. आतापर्यंत सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 14,223 रुग्णांना उपचारासाठी दाखल केले आहे, ज्यापैकी 13000 लोक बरे झाले आहेत.