अमेरिकेतही साजरा होणार राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा; 5 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कच्या Times Square वर प्रदर्शित होणार श्री रामाचे छायाचित्र व अयोध्येच्या मंदिराचे मॉडेल
या सोहळ्याची चर्चा आता साता समुद्रापार अमेरिकेतही (US) होत आहे.
5 ऑगस्टला अयोध्येत (Ayodhya) होत असलेल्या श्री राम मंदिराच्या (Lord Ram Temple) भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबाबत देशभर उत्साह संचारला आहे. या सोहळ्याची चर्चा आता साता समुद्रापार अमेरिकेतही (US) होत आहे. अमेरिकेत 5 ऑगस्टला राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा भव्यदिव्य रीतीने साजरा होणार आहे. 5 ऑगस्टला न्यूयॉर्क (New York) मधील आयकॉनिक अशा टाइम्स स्क्वेअर (Times Square) वर भगवान रामाचा भव्य फोटो प्रदर्शित केला जाणार आहे. यासह टाइम्स स्क्वेअरवर राममंदिराचे थ्रीडी चित्रही दाखविण्यात येणार आहे. टाइम्स स्क्वेअर हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय असे पर्यटनस्थळ आहे व याआधीही या ठिकाणी अनेक सोहळ्याचे फोटो प्रदर्शित झाले आहेत.
प्रख्यात समुदाय नेते आणि अमेरिकन इंडिया पब्लिक अफेयर्स कमिटीचे अध्यक्ष जगदीश सेवानी यांनी बुधवारी सांगितले की, 5 ऑगस्ट रोजी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी करतील, तेव्हा न्यूयॉर्कमध्ये हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्याची व्यवस्था केली जात आहे. जगदीश सेवानी यांनी पीटीआयला सांगितले की, या प्रसंगी भाड्याने घेण्यात आलेल्या मोठ्या होर्डिंग्जमध्ये अतिविशाल Nasdaq Screen आणि 17, 000 चौरस फूट Wrap-Around एलईडी डिस्प्ले स्क्रीनचा समावेश आहे. (हेही वाचा: राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या तोंडावर सहाय्यक पुजाऱ्यासह 16 पोलीस कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित)
ही 17,000 चौरस फूट Wrap-Around एलईडी स्क्रीन टाइम्स स्क्वेअरमधील सर्वात उच्च रिझोल्यूशन एलईडी स्क्रीन असल्याचे मानले जाते. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हिंदी आणि इंग्लिशमध्ये 'जय श्री राम', भगवान रामाचे फोटो आणि व्हिडिओ, मंदिराची रचना आणि वास्तुकलेचा 3 डी फोटो यासह पंतप्रधानांनी पायाभरणी केलेल्या शिलान्यासचे फोटो टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित होतील. जगदीश सेवानी यांनी पुढे सांगितले की, ‘भारतीय समितीचे लोकही 5 ऑगस्टला टाईम्स स्क्वेअरवर हजर राहतील आणि या आनंददायी प्रसंगी मिठाई वाटप करतील. हा प्रसंग मानवजातीमध्ये एकदाच येत असल्याने तो मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.’