Gold Jewellery Trends 2025: सोने महागताच ग्राहकांनी ट्रेण्ड बदलला; 22 Carat ऐवजी दागिन्यांमध्ये 18 कॅरेटची मागणी वाढली
मौल्यवान धातू म्हणजेच सोने दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहक आता दागिने बनविण्यासाठी 22 कॅरेटवरुन 18 कॅरेट सोन्याकडे वळले आहेत.
जगभरात मौल्यवान धातू अशी ओळख असलेल्या सोन्याच्या किमती अभूतपूर्व उच्चांकावर पोहोचल्याने, भारतातील दागिने खरेदीदार पारंपारिक 22 -कॅरेट (22 Carat Gold) सोन्यापासून अधिक परवडणाऱ्या 18 -कॅरेट (18 Carat Gold) पर्यायांकडे पसंतीमध्ये लक्षणीय बदल दर्शवत आहेत. मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या भारतीय ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक ओ आशर यांनी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बदलत्या ट्रेंडबद्दल (Gold Jewellery Trends 2025) माहिती दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना बुधवारी (28 मे) ते म्हणाले की, वाढत्या किमतींमुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदी सवयींचा पुनर्विचार करावा लागला आहे.
दागिन्यांच्या विक्रीमूल्यांत वाढ, मात्र प्रति ग्राहक खरेदी घटली
ओ आशर यांनी सांगितले की, एकूण विक्री मूल्य जरी वाढले असले तरी, प्रति ग्राहक खरेदीचे प्रमाण घटले आहे. एखाद्या ग्राहकाचे बजेट एक लाख रुपये आहे, तर दरवाढीनंतरही ते वाढत नाही. म्हणूनच आम्ही आमची रणनीती बदलली आहे, असे ते म्हणाले.
हलक्या वजनाचे पण पूर्वीप्रमाणेच डिझाईन असलेले दागिने
ग्राहकांचे बजेट लक्षात घेता, त्यांची खरेदीसाठीची क्षमता कायम ठेवण्यासाठी कंपनीने हलक्या वजनाचे दागिने तयार करण्यास सुरुवात केली आहे. डिझाईन तसेच आहे, पण वजन थोडेसे कमी केल्यामुळे ग्राहकांना परवडणारे दागिने मिळू शकतात, असे ओ आशर म्हणाले. काही भागांमध्ये ग्राहक 22 कॅरेटऐवजी 18 कॅरेट दागिने घेण्याकडे वळताना दिसत आहेत, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांचा ऐतिहासिक वाढ
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या दरात 2025 मध्ये 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, गेल्या वर्षभरात ही वाढ सुमारे 45 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा अनपेक्षित दरवाढीमुळे पारंपरिक पद्धतीने सोन्याची खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचे प्रमाण घटले आहे.
सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याचा आकर्षण
भारतासह संपूर्ण जगात सोन्याचे दर सर्वोच्च किंवा जवळपासच्या पातळीवर पोहोचले आहेत. यामागे ट्रम्प यांच्या परस्पर शुल्क धोरणासह जागतिक व्यापारातील अनिश्चितता कारणीभूत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आकर्षण वाढले आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
मलबार ग्रुपकडून निर्यात वाढीचा विश्वास
भारतीय निर्यात संघटना (FIEO) यांनी 2025–26 मध्ये 1 ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. याबाबत अॅशर म्हणाले की, आमचे लक्ष भारतात उत्पादन करून जगभर विक्री करण्यावर आहे. आम्ही 13 देशांमध्ये कार्यरत आहोत. पंतप्रधानांच्या व्हिजननुसार उद्योगांनी काम केल्यास हे उद्दिष्ट साध्य होईल याची मला पूर्ण खात्री आहे.
बाजारावरील स्थितीबाबत अध्यक्षांचे निरीक्षण
मलबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनी सध्याच्या बाजार परिस्थितीबाबत माहिती दिली. सोन्याचे दर सध्या अनिश्चित आहेत. ट्रम्प यांच्या शुल्क धोरणामुळे आणि जागतिक तणावामुळे दर वाढले आहेत. मात्र, गेल्या 25–30 वर्षांत सातत्याने सोन्याच्या किमती वाढत असल्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे, असे अहमद म्हणाले.
RBI कडून सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ
जगभरातील सरकारे आणि मध्यवर्ती बँका सोन्याला प्राधान्य देत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाटा 2021 पासून जवळपास दुप्पट केला आहे. RBI च्या "Management of Foreign Exchange Reserves" अहवालानुसार, सोन्याचा वाटा मार्च 2021 मध्ये 5.87 टक्के होता, जो मार्च 2025 मध्ये 11.70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये हा वाटा 9.32 टक्के होता.
संकटाच्या काळात सोनं कायम गुंतवणुकीसाठीचा विश्वासार्ह पर्याय
इतिहासात अनेकदा सिद्ध झाले आहे की, संकटाच्या काळात सोनं हा एक विश्वासार्ह आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय राहतो. आर्थिक अस्थिरता किंवा जागतिक तणाव यासारख्या स्थितीतही सोन्याचे मूल्य टिकून राहते किंवा वाढते, म्हणूनच हे गुंतवणूकदार आणि सरकारांसाठी लोकप्रिय पर्याय बनले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2025 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

