Godhra Train Burning Case: गोध्रा हत्याकांड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला 8 दोषींना जामीन
या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली पेटल्या. हजारो जणांनी त्यामध्ये आपला जीव गमवला आहे.
गुजरात (Gujrat) मधील गोध्रा (Godhra) येथे 2002 साली साबरमती एक्सप्रेसचा (Sabarmati Express) डब्बा जाळत 59 जणांची हत्या झाली होती. आज या प्रकरणी दोषी ठरलेल्या 8 जणांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अब्दुल सत्तार गद्दी, युनूस अब्दुल हक, मोहम्मद, हनीफ, अब्दुल रौफ, इब्राहिम अब्दुल रझाक, अयुब अब्दुल गनी, सोहेब युसूफ आणि सुलेमान अहमद अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आठ दोषींना हा जामीन दिला आहे. दरम्यान या 8 जणांना कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली होती. मागील 18 वर्ष तुरूंगात घालवली असल्याच्या कारणावरून आता त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान याच प्रकरणामध्ये कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आणि उच्च न्यायालयाने जन्मठेप दिलेल्या 4 जणांना मात्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे.
अन्वर मोहम्मद, सौकत अब्दुल्ला, मेहबूब याकूब मिथा आणि सिद्दीक मोहम्मद मोरा या चार जणांची सुटका करण्यास न्यायालयाने आज नकार दिला आहे. गोध्रा हत्याकांडात थेट सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला आहे. त्यामुळे गुजरात सरकारने त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
गोध्रामध्ये रेल्वेचा डबा जाळल्यानंतर त्यामध्ये 59 जणांचा जीव गेला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली पेटल्या. हजारो जणांनी त्यामध्ये आपला जीव गमवला आहे. BBC Documentary On PM Modi: पीएम मोदींवरील बीबीसीने तयार केलेली डॉक्युमेंटरी यूट्यूब आणि ट्विटरवर दिसणार नाही; केंद्राने जारी केल्या सूचना .
पहा ट्वीट
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फारुखला आधीच जामीन मंजूर केला आहे. मागील वर्षी 15 डिसेंबर रोजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या फारुखला 17 वर्षे तुरुंगात असल्याचे सांगत जामीन मंजूर केला होता. मात्र, सॉलिसिटर जनरल यांनी फारुखला जामीन देण्यास विरोध केला होता. गुजरात सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बोगी बाहेरून पेटवण्यात आल्याचे म्हटले होते. या जाळपोळीत महिला आणि लहान मुलांसह 59 जणांनी जीव गमावला. तुषार मेहता म्हणाले होते की, काहींची भूमिका केवळ दगडफेकीपुरती मर्यादित असल्याचे म्हटले जात आहे. पण जेव्हा तुम्ही बोगीला बाहेरून टाळं लावता, त्याला आग लावता आणि नंतर दगडफेक करता, तेव्हा ती केवळ दगडफेक राहत नाही.