गोवा: केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक कोविड 19 उपचारांसाठी रूग्णालयात दाखल

67 वर्षीय श्रीपाद नाईक यांना ताप आल्याने त्यांना गुरूवारी रात्री पणजीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Shripad Naik (Photo Credits-ANI)

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरूवातीला त्यांना होम क्वारंटीन करण्यात आले होते मात्र आज त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गोव्यातील खाजगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान 12 ऑगस्ट दिवशी त्यांनी ट्वीटरच्या माध्यामातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यावेळेस कोरोना रिपोर्ट assymptomaically positive आल्याने होम आयसोलेशनमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळीच त्यांनी मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्यांनी आवश्यक काळजी घ्या. असं आवाहन देखील केले होते.

67 वर्षीय श्रीपाद नाईक यांना ताप आल्याने त्यांना गुरूवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असून आता ताप उतरल्याची माहिती त्यांच्या मुलाने पीटीआयशी बोलताना दिली आहे. श्रीपाद नाईक यांच्या पत्नी देखील कोरोनाबाधित असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

प्रोटोकॉलनुसार, गोव्यातील श्रीपाद नाईक यांचे कार्यालय सॅनिटाईज करण्यासाठी बंद करण्यात आले असून येत्या सोमवार, 17 ऑगस्टपासून ते पुन्हा सुरू केले जाईल. श्रीपाद नाईक हे भाजपाचे दक्षिण गोव्याचे खासदार आहेत.