गोवा: पणजी येथे आजपासून सलूनची दुकाने सुरु पण 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम
त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन दिवसांपूर्वीच नव्याने मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर केली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन दिवसांपूर्वीच नव्याने मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार कोणत्या ठिकाणी काय सुरु असणार आणि नाही या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच देशाची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी ही करण्यात आली आहे. याच दरम्यान, गोवा हे कोरोनामुक्त झाले आहे. मात्र येथे 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केला आहे. पण पणजी येथे आजपासून सलूनची दुकाने सुरु करण्यात आली आहेत.
गोवा हे देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य ठरले आहे. त्यामुळे प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त करत वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. तर गोव्यात सध्या सिनेमागृह, कसिनो, नाईट लाईफ, रेस्टॉरंट-बार, ब्युटीपार्लर- मसाज पार्लर बंद राहणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. गोवा सध्या ग्रीन झोनमध्ये असले तरीही तेथे पर्यटनासंबंधित कोणत्याच गोष्टी सुरु करण्यात आल्या नसून त्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तर केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे आता गोव्यात पालन केले जाणार आहे.(कौतुकास्पद! एकेकाळी Coronavirus ची सर्वाधिक प्रकरणे असलेल्या केरळमध्ये आज नवीन एकही रुग्ण आढळला नाही; राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या फक्त 95 वर)
दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर देशात कोरोनाबाधितांचा आकडा 42 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घेत नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. आजपासून विविध ठिकाणी काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून दारुची दुकाने बंद असल्याने आजपासून ती सुरु होणार असल्याने नागरिकांनी सकाळपासूनच दुकानांच्या बाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली आहे.