Ghaziabad Horror: चहा बनवण्यास 10 मिनिटे झाला उशीर; पतीने पत्नीची तलवारीने 15 वार करून केली हत्या
मात्र लाकूड ओले असल्याने चुलीवर चहा बनवण्यास उशीर झाला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, धरमवीरने घरात ठेवलेल्या तलवारीने सुंदरीच्या डोक्यावर व मानेवर अनेक वार केले.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये (Ghaziabad) किरकोळ कारणावरून पतीने पत्नीची तलवारीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चहा करायला 10 मिनिटे उशीर झाल्याने पतीने पत्नीची तलवारीने 15 वार करून हत्या केली आहे. धरमवीर असे या पतीचे नाव असून, सुंदरी (50) असे मृत पिडीत महिलेचे नाव आहे. सुंदरीला चहा बनवायला थोडा वेळा लागला त्यानंतर तिचे व धरमवीर भांडण झाले या भांडणात त्याने तलवारीने वार करून तिची हत्या केली. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मोदीनगर भागातील फलजागढ गावात ही घटना घडली आहे. दाम्पत्याच्या मुलाने सुंदरीचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी धरमवीरने त्याच्यावरही हल्ला केला.
त्यानंतर मुलाने कसे तरी शेजाऱ्यांच्या मदतीने धरमवीरला पकडले. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळावरून रक्ताने माखलेली तलवारही जप्त करण्यात आली आहे. एसीपी ज्ञान प्रकाश राय यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून आरोपी धरमवीरला अटक करण्यात आली आहे. अटकेदरम्यान आरोपीचे हात रक्ताने माखले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भोजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाजलगढ गावात राहणारा धरमवीर सिंह याचा विवाह सुंदरी देवी (50, रा. कैली, हापूर) हिच्याशी सुमारे 25 वर्षांपूर्वी झाला होता. धरमवीर हा भोजपूर पोलीस ठाण्याजवळ फळांचा व्यवसाय करायचा. काही काळ त्याने गावात भाजीविक्रेते म्हणूनही काम केले होते. धरमवीरला 5 मुले आहेत. एका मुलीचे लग्न झाले आहे. दोन मुली आणि 2 मुलगे एकत्र राहतात. मंगळवारी सकाळी मुले घराच्या खालच्या भागात तर पती-पत्नी वरच्या मजल्यावर होते. (हेही वाचा: Karnataka News: शालमला नदीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू; 3 मृतदेह सापडले, शोधमोहिम सुरु)
मंगळवारी सकाळी अती थंडीमुळे धरमवीरने पत्नीला चहा बनवण्यास सांगितले होते. मात्र लाकूड ओले असल्याने चुलीवर चहा बनवण्यास उशीर झाला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, धरमवीरने घरात ठेवलेल्या तलवारीने सुंदरीच्या डोक्यावर व मानेवर अनेक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुंदरीने बचावासाठी आरडओरडा केला. आईचा आवाज ऐकून मुले गच्चीवर आली. त्यांनी वडिलांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र धरमवीरने त्यांच्यावरही हल्ला केला. जखमी होऊन पडल्यानंतरही आरोपीने महिलेवर हल्ला करणे सुरूच ठेवला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने धरमवीरला पकडण्यात आले व पोलिसांना याची माहिती दिली गेली.