Gadchiroli Floods: गडचिरोलीत पुरामुळे 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला; 'गोसीखुर्द'चे 12 दरवाजे बंद

धरणाचा जलसाठा नियंत्रित असल्यानं आज सकाळपासून धरणाचे 12 गेट बंद करून आता 21 गेट मधून 85 हजार 764 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Gosekhurd Dam

एकीकडे महाराष्ट्रात (Maharashtra) काही जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकरी (Farmers) पावसाची आतुरतेने वाट पाहत असून दुसरीकडे गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्खळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 8 प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे.  (हेही वाचा - Maharashtra Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता,या भागात ऑरेंज अलर्ट)

सोमवारी गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 गेट उघडण्यात आले होते. धरणाचा जलसाठा नियंत्रित असल्यानं आज सकाळपासून धरणाचे 12 गेट बंद करून आता 21 गेट मधून 85 हजार 764 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहा असे आवाहन केले आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने 8 प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भामरागडलगतच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्यातील 60 हुन अधिक गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे. पर्लकोटा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र हे पूल पूर्णत्वास आले नसल्याने जुन्या पुलावर तब्बल चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने भामरागडसह भामरागड पलीकडील 60 हुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.