अल्पवयीन मुलांना Freefire Game चे व्यसन; गेम खेळण्यासाठी घरातून लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी
या घटनेनंतर मुलांना फ्री फायर गेम्ससारख्या खेळांपासून दूर ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे
फ्री फायर गेमची (Freefire Game) सवय मुलांसाठी किती घातक ठरू शकते, याचे ताजे उदाहरण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरपूर जिल्ह्यात पाहायला मिळाले. फ्री फायर गेमच्या व्यसनामुळे अल्पवयीन मुलांना चोरी करण्यास भाग पाडले. या गेममुळे मुलांनी त्यांच्याच घरात चोरी केली. मुलांनी मिळून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड पळवली. ऑनलाईन क्लास सुरू असताना घरातील लोक त्यांना अभ्यासासाठी मोबाइल देत असत तेव्हा त्यांना या गेमचे व्यसन जडले.
हे प्रकरण छतरपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या ठिकाणी पालकांनी स्वतः कोतवाली पोलीस ठाण्यात घरातील चोरीची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरातून चार तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम गायब झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता या चोरीमागे अल्पवयीन मुलांचा हात असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात घरातील मुलगा फ्री फायर गेमच्या नादात दागिने व रोख रक्कम चोरत असल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदाराचा अल्पवयीन मुलगा रोहन (नाव बदलले आहे) हा ऑनलाइन अभ्यासासाठी वडिलांचा फोन वापरत होता. त्याचा एक शेजारील मित्रही ऑनलाइन क्लासेस घेत होता. त्यावेळी या दोघांना फ्री फायर गेम खेळण्याचे व्यसन जडले. यासाठी त्यांनी स्वत:साठी नवीन मोबाईल घेण्याचे ठरवले. या अल्पवयीन मुलांचे वय 16 आणि 12 वर्षे आहे. घरातील सोने विकून त्यांनी मोबाईल घेतला आणि मोबाईल रिचार्ज करण्यासाठी दोघांनी स्वतःच्या घरातून 20 हजार रुपयेही चोरले. त्यांच्या कुटुंबियांना ही गोष्ट कळूपर्यंत मुलांनी 14 हजारांचे रिचार्ज केले होते. (हेही वाचा: 5G in India: लवकरच Internet चा स्पीड वाढणार; देशात 2022-23 मध्ये सुरु होणार 5 जी सेवा)
सप्टेंबर 2021 मध्ये, 12 वर्षांच्या मुलाने घरातून आईचा सोन्याचा हार आणि वडिलांची चेन चोरली. या घटनेनंतर मुलांना फ्री फायर गेम्ससारख्या खेळांपासून दूर ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच मुल ऑनलाइन अभ्यास करत असेल तर, तो ते कसा आणि नक्की काय अभ्यास करत आहे यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.