Former President Pranab Mukherjee Passes Away: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्यक्त केला शोक

Condolences to Pranab Mukherjee | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर (Former President Pranab Mukherjee Passes Away) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यासह राज्याचे पर्यटण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह विविध मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी भारताने एक प्रख्यात राजकारणी आणि शूर मुलगा गमावल्याचे म्हटले आहे. तर, आदित्य यांनी प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांनी आपली छाप राजकारण आणि विविध क्षेत्रातील सर्व वयोगटावर सोडली, अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे.

परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम म्हणजे प्रणवदा- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे व्यक्तिमत्व भारतीय परंपरा आणि अधुनिकता यांचा सुरेख संगम होता. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये अनेक उच्च पद भूषवली. असे असले तरी त्यांची पावले नेहमीच जमीनीशी जोडलेली राहिली. आपल्या सौम्य आणि मृदू स्वभावामुळे राजकारणासह सर्वच क्षेत्रांमध्ये ते लोकप्रिय राहिले.

पहिल्या दिवसापासून प्रणवदांचे आशीर्वाद मिळाले - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सन 2014 मध्ये मी दिल्लीत नवीन होतो. पहिल्या दिवसापासूनच मला प्रणव मुखर्जी यांचे मार्गदर्शन, पाठबळ व आशीर्वाद मिळाले. त्यांच्याशी केलेल्या संवादांची मी नेहमीच आदर करतो. त्याचे कुटुंब, मित्र, हितचिंतकांसाठी माझ्या सद्भावना. प्रणवदांना श्रद्धांजली.

देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे. गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेस धार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचा विचार करून त्यांनी पावले टाकली.

देशाने सांसदीय राजकारणातील भीष्म पितामह गमावले- राज्यपाल कोश्यारी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे की, 'जवळ जवळ चार दशके सातत्याने संसदेचे सदस्य असलेल्या प्रणब मुखर्जी यांनी देशातील सांसदीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी असाधारण असे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे देशाने सांसदीय राजकारणातील भीष्म पितामह गमावले आहे'. (हेही वाचा, Former President Pranab Mukherjee Passes Away: माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दिल्ली येथील आर्मी रुग्णालयात निधन)

भारताने प्रख्यात राजकारणी गमावला- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'भारतरत्न प्रणव मुखर्जी हे एक आदरणीय सहकारी, सहकारी खासदार आणि प्रिय मित्र होते. आपल्यावर सोपवलेल्या कोणत्याही जबाबदाऱ्यांपासून ते कधीही मागे हटले नाहीत. नेहमीच त्यांनी भारताच्या उन्नतीसाठी निर्धाराने कार्य केले. भारताने एक प्रख्यात राजकारणी आणि शूर मुलगा गमावला आहे'. (हेही वाचा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदासाठी पाठींबा; शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका, भाजपला धक्का)

सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कायम ठेवणारे प्रणवदा- आदित्य ठाकरे, राजशिष्टाचार मंत्री

राज्याचे राजशिष्टाचार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, प्रणव मुखर्जी हे असे नेते होते, ज्यांनी आपली छाप राजकीय रंगभूमीवर आणि सर्व वयोगटात सोडली. कित्येक दशकांची एक प्रख्यात राजकीय कारकीर्द आणि सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कायम ठेवणारे प्रणवदा यांना विनम्र श्रद्धांजली

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून तिव्र दु:ख व्यक्त होत आहे. यासोबतच प्रणव मुखर्जी यांचे राजकारणातील योगदान आणि अनेक आठवणींची चर्चा होत आहे.