भारतीय अर्थव्यवस्था युरोप, अमेरिका देशांपेक्षा चांगली; अर्थमंत्री निर्मला सीतारमण

जगाचा जीडीपी (GDP) विचारात घेता तो 3.4 टक्के इतका आहे. त्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बरीच उत्तम आहे, असे सांगतानाच भारतीय अर्थव्यवस्था युरोप, अमेरिका यांच्यापेक्षा चांगली असल्याचेही अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

Finance Minister Nirmala Sitharaman | (Photo Credits: ANI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman)  यांनी भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) ही इतरांपेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे असे म्हटले आहे. सध्यास्थितीत अमेरिका (America)  आणि जर्मनी (Germany)आदी देशांच्या विकासदरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जगभरातील अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. जगाचा जीडीपी (GDP) विचारात घेता तो 3.4 टक्के इतका आहे.  त्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बरीच उत्तम आहे, असे सांगतानाच भारतीय अर्थव्यवस्था युरोप, अमेरिका यांच्यापेक्षा चांगली असल्याचेही अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत भारताची आर्थिक स्थिती याबाबत शुक्रवारी (23 ऑगस्ट 2019) माहिती दिली. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या अमेरिका, चीन यांच्यातील व्यापरयुद्धाचाही भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. आम्ही देशात अनेक सुधारणा केल्या. जसे की, कामगार कायदा, पर्यावरण, देशातील कर जमा करण्याची प्रक्रियाही आम्ही सोपी केली. देशांतर्गत सुधारणांची प्रक्रिया निरंतर सुरुच आहे, असेही सीतारमण यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, नीति आयोग उपाध्यक्ष Rajiv Kumar म्हणतात 'भारताची अर्थव्यवस्था गेल्या 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या वाईट स्थितीत')

एएनआय ट्विट

दरम्यान, अर्थमंत्री सीतारमण यांनी सरकारी बँकांना 70 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या रेपो रेटसोबत व्याजदरही जोडला जाईल. रेपो रेट कमी झाल्यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होईल. यापुढे कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन पाहिले जातील असेही, सीतारमण म्हणाल्या.