Farmers' Protest: सिंघू बॉर्डरवर संत बाबा राम सिंह यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

बाबा रामसिंह हे करनालचे रहिवासी होते. त्यांची एक सुसाइड नोटही समोर आली आहे

Sant Baba Ram Singh (Photo Credits: Twitter)

नवीन कृषी कायद्याविरोधात (Farm Laws) चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलना (Farmers' Protest) विषयी सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवर (सिंघू सीमा) शेतकर्‍यांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे संत बाबा राम सिंह (Sant Baba Ram Singh) यांनी बुधवारी आत्महत्या केली आहे. बाबा रामसिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा रामसिंह यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाबा रामसिंह हे करनालचे रहिवासी होते. त्यांची एक सुसाइड नोटही समोर आली असून, त्यात त्यांनी शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठविला आहे.

बाबाजींचे सेवादार गुरमीत सिंह यांनीही घटनेची पुष्टी केली आहे. असे सांगितले जात आहे की बाबाजींचे फक्त हरियाणा आणि पंजाबच नव्हे तर, जगभरात कोट्यावधी अनुयायी आहेत. यापूर्वी कुंडली सीमेवर केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी चळवळीत मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: मोदी कॅबिनेट कडून 5 कोटी उस शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट, साखरेच्या निर्यावरील सब्सिडीसाठी दाखवला हिरवा कंदिल)

खबरदारी म्हणून दिल्ली वाहतूक पोलिसांनी टिकरी, धनसा सीमा या कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केल्या आहेत. पोलिसांनी झटिकारा सीमा केवळ दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी खुली ठेवली आहे. त्याच वेळी अशी बातमी आहे की निषेध करणार्‍या शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा नोएडाला दिल्लीशी जोडणारी चिल्ला सीमा रोखली आहे, यामुळे नोएडा लिंक रोड बंद करण्यात आला आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मोठ्या संख्येने शेतकरी पुन्हा चिल्ला सीमेवर पोहोचले आहेत.

नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्ली, हरियाणाचे शेतकरी गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्ली सीमेवर निदर्शने करीत आहेत. अनेकवेळा चर्चा होऊनही सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. तिन्ही कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, जवळजवळ दररोज शेतकरी मरत आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात, थंड हिवाळ्यामध्ये असे प्रदर्शन करणे खूप आव्हानात्मक आहे. मात्र, शेतकरी आपल्या मतावर ठाम आहेत. ते म्हणाले की ते 6 महिन्याच्या तयारीनिशी आले आहेत. या आंदोलनात सहभागी 11 हून अधिक शेतकरी आतापर्यंत मरण पावले आहेत.