IPL Auction 2025 Live

प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि तिहार जेलचा अधिकारी Deepak Sharma ची तब्बल 51 लाखाची फसवणूक; हेल्थ प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने घातला गंडा

या ठिकाणी तो अजून एक स्पर्धक रौनक गुलियाला भेटला. यावेळी रौनक दीपक यांच्यामध्ये मैत्री झाली.

Deepak Sharma (संग्रहित संपादित प्रतिमा)

विविध मार्गांनी सामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या कैक घटना रोज समोर येत असतात. आता चक्क एका पोलिसाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. लोकप्रिय बॉडी बिल्डर आणि दिल्लीतील तिहार तुरुंगातील जेलर दीपक शर्मा याची तब्बल 51 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. आरोग्य पूरक उत्पादनात गुंतवणूक करून, त्याला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याच्या नावाखाली दीपक शर्मा याची 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. एका महिलेने तिच्या पतीसह शर्मा याला गंडा घातल्याचा आरोप आहे.

माहितीनुसार, दीपक शर्मा आपल्या कुटुंबासह पूर्व दिल्लीतील पश्चिम विनोद नगरमध्ये राहतो. तो तिहार कारागृहात सहायक अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. बॉडी बिल्डिंग आणि रिअॅलिटी शोमधील सहभागामुळे सोशल मिडियावर तो लोकप्रिय आहे.

दीपक शर्माने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, डिस्कव्हरी चॅनलवरील ‘अल्टीमेट वॉरियर’ या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता. या ठिकाणी तो अजून एक स्पर्धक रौनक गुलियाला भेटला. यावेळी रौनक दीपक यांच्यामध्ये मैत्री झाली. रौनक गुलियाने दीपकला सांगितले की, तिचा पती अंकित गुलिया हा एका प्रसिद्ध आरोग्य उत्पादनाचा उद्योजक आहे.

दीपक म्हणतो, मे 2022 मध्ये रौनकच्या कंपनीच्या सप्लिमेंट ब्रँडच्या लॉन्च पार्टीमध्ये तो रौनकचा पती अंकितला भेटला. जानेवारी 2023 मध्ये रौनकने दीपकला सांगितले की तिच्या पतीचा व्यवसाय चांगला चालला आहे आणि त्यांना भरपूर नफा मिळत आहे. परंतु अजून ब्रँड आणि आउटलेट उघडण्यासाठी अधिक पैसे आवश्यक आहेत. यावेळी तिने दीपकसमोर गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला. रौनकने दीपकला तिच्या पतीच्या कंपनीत 51 लाख रुपये गुंतवण्याची ऑफर दिली आणि 10 ते 15 टक्के नफ्यासह ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याची ऑफरही दिली. त्यानंतर दीपकने वेगवेगळ्या माध्यमातून पैसे गोळा करून त्यांना 51 लाख रुपये दिले. (हेही वाचा: Karnataka: तरुंगातून पळाला बलात्कार प्रकरणाती आरोपी, 40 फूट भिंतीवरुन ठोकली उडी)

एप्रिलमध्ये दीपकचा त्याचा नफा मिळणार होता मात्र त्याला ते पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याचे लक्षात आले. त्याने चौकशी केली असता यापूर्वीही गुलिया नवरा-बायकोने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दीपकने मधु विहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या गुलिया दाम्पत्य पसार झाले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.