EVM Hack Claim: ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल' निवडणूक आयोगाने 'तो' व्हिडिओ खोटा ठरवला

यामध्ये एक तरुण दावा करताना दिसत आहे की, तो ईव्हीएम हॅक करू शकतो आणि काही राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल बदलू शकतो.

Photo Credit - X

EVM Hack Claim: सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून ईव्हीएम (EVM) हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येणार नाही, असा पुनरुच्चार केला आहे. ही बाब समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक कार्यालय महाराष्ट्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये, महाराष्ट्र निवडणूक कार्यालयाने लिहिले आहे की, ‘ईव्हीएमबद्दल खोटा दावा: काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती महाराष्ट्र निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याची वारंवारता बदलत आहे. ईव्हीएम हे खोटे आणि निराधार दावे आहेत.’

ज्या व्हिडिओवरून ही कारवाई करण्यात आली आहे, तो व्हिडीओ इंडिया टुडेच्या विशेष तपासाअंतर्गत समोर आला आहे. यामध्ये एक तरुण दावा करताना दिसत आहे की, तो ईव्हीएम हॅक करू शकतो आणि काही राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल बदलू शकतो. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते ईव्हीएम हॅक करू शकतात, असे त्याने सांगितले आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांनी आणि काही राजकीय नेत्यांनीही शेअर केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रे- एसपीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनीही ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला आणि शनिवारी (30 नोव्हेंबर 2024) सांगितले की, ईव्हीएम हॅक होऊ शकतात. काही लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिले, पण आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. आता वाटते की, ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Shrikant Shinde on Deputy CM Post: उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर अखेर श्रीकांत शिंदे यांनी सोडलं मौन; पहिल्या प्रतिक्रीयेतच सर्व गोष्टींचा केला उलगडा)

दरम्यान, ईव्हीएममधील छेडछाड आणि संध्याकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याच्या आरोपावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सीपीआयएमचे राज्यसभा सदस्य जॉन ब्रिटास यांनी महाराष्ट्रातील मतदानाच्या टक्केवारीत छेडछाडीबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यापूर्वी काँग्रेसनेही याबाबत प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. पत्रात ब्रिटास यांनी मतदानाच्या आकडेवारीत छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.