राष्ट्रीय स्तरावरील वेतन निश्चित करण्यासाठी सरकारकडून तज्ञ समितीची स्थापना
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने एक आदेश जारी केला असून किमान वेतन आणि राष्ट्रीय स्तरावरील किमान वेतन निश्चित करण्याबाबत, तांत्रिक माहिती देण्यासाठी आणि शिफारसी करण्यासाठी तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे.
किमान वेतन आणि राष्ट्रीय स्तरावरील किमान वेतन निश्चित करण्याबाबत, तांत्रिक माहिती देण्यासाठी आणि शिफारसी करण्यासाठी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने एका तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी या गटाची स्थापना करण्यात आली आहे.
आर्थिक विकास संस्थेचे संचालक प्रा. अजित मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली हा तज्ज्ञ गट स्थापन करण्यात आला आहे. आयआयएम कोलकात्याच्या प्रा. तारिका चक्रवर्ती, एनसीएईआरच्या वरिष्ठ सहकारी डॉ. अनुश्री सिन्हा, सहसचिव श्रीमती विभा भल्ला, व्हीव्हीजीएनएलआय चे महासंचालक डॉ.एच. श्रीनिवास हे तज्ज्ञ समूहाचे सदस्य आहेत. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे वरिष्ठ कामगार आणि रोजगार सल्लागार श्री. डी.पी. एस. नेगी हे या गटाचे सदस्य सचिव आहेत.
तज्ञ गट सरकारला किमान वेतन आणि राष्ट्रीय स्तरावरील वेतनाबाबत शिफारसी करेल. वेतनाचे दर ठरविण्याच्या दृष्टीने, हा तज्ञ गट वेतनासंदर्भातील आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींचा शोध घेईल आणि वेतन निश्चित करण्यासाठी वैज्ञानिक निकष आणि पद्धती विकसित करेल.