E-Air Taxis in India: भारतामध्ये 2026 पर्यंत सुरु होऊ शकते हवेत उडणारी टॅक्सी सेवा; 90 मिनिटांचा प्रवास होणार 7 मिनिटांत पूर्ण
भारतासारख्या दाट लोकसंख्येच्या देशात ही सेवा खूप प्रभावी ठरू शकते. विशेषत: आपत्कालीन समस्यांमध्ये लोक अशी सेवा सहजपणे वापरू शकतील.. याशिवाय यामुळे रस्त्यांवरील भीषण वाहतूक कोंडीपासूनही दिलासा मिळेल.
भारतामध्ये लवकरच हवेत उडणाऱ्या टॅक्सी (E-Air Taxis) पाहायला मिळणार आहेत. अहवालानुसार, 2026 पर्यंत देशाला पहिली पूर्ण-इलेक्ट्रिक एअर टॅक्सी मिळण्याची शक्यता आहे. ही सेवा भारतात आणण्यासाठी इंटरग्लोब एंटरप्रायझेस आणि आर्चर एव्हिएशन यांनी हातमिळवणी केली आहे. भारतात एअर टॅक्सी सेवा आल्यानंतर, दिल्लीतील कॅनॉट प्लेस ते गुडगाव असा प्रवास फक्त सात मिनिटांत करता येईल. सध्या या प्रवासाला कारने साधारणत: 60 ते 90 मिनिटे लागतात. दोन्ही कंपन्यांनी भारतात पूर्ण-इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मात्र, त्यासाठी नियमावलीची मंजुरी मिळणे बाकी आहे.
लॉजिस्टिक व्यवसायात सुमारे 38% भागीदारी असलेले इंटरग्लोब एंटरप्रायझेस, मेट्रो शहरांमध्ये हवाई टॅक्सी सेवा देण्याबरोबरच कार्गो, लॉजिस्टिक, वैद्यकीय, आपत्कालीन आणि चार्टर सेवांसाठी ई-विमान वापरण्याची योजना आखत आहे. याशिवाय खाजगी कंपन्याही त्यांची वाहने भाड्याने घेऊ शकतील. वैमानिक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच भारतात या सेवेसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याचे कामही केले जाणार आहे. इंटरग्लोब एंटरप्रायझेस हा एक भारतीय प्रवासी गट आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो ही त्याचाच एक भाग आहे.
आर्चर एव्हिएशन ही इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग (EVTOAL) विमानचालनातील एक आघाडीची कंपनी आहे, ज्याला शहरी हवाई गतिशीलतेचे भविष्य म्हणून पाहिले जाते. ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. याचे मुख्यालय सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे आहे. कंपनीने दावा केला आहे की ते, 150 mph (240 km/h) वेगाने 100 मैल (160 किमी) पर्यंतचे अंतर कापू शकते. युनायटेड एअरलाइन्सने कंपनीला 200 आर्चर इलेक्ट्रिक विमानांची ऑर्डर दिली आहे.
या कंपनीचे 'मिडनाईट' ई-विमान 4 प्रवासी आणि एक पायलट यांन 100 मैल (सुमारे 161 किलोमीटर) पर्यंत वाहून नेऊ शकते. कंपनीला राष्ट्रीय राजधानी दिल्ली, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये अशी सेवा सुरू करायची आहे. या वर्षी जुलैमध्ये, आर्चर एव्हिएशनने अमेरिकन हवाई दलाला 6 मिडनाईट ई-विमान प्रदान करण्यासाठी $142 दशलक्ष किमतीचा करार केला. ऑक्टोबरमध्ये ते यूएईमध्ये एअर टॅक्सी सेवा सुरू करतील. (हेही वाचा: Ferrari Electric Car: इटालियन लक्झरी स्पोर्ट्स कार उत्पादक 'फरारी' इलेक्ट्रिक कारच्या शर्यतीत सामील; 2025 मध्ये लॉन्च करणार आपली पहिली ईव्ही)
दरम्यान, भारतासारख्या दाट लोकसंख्येच्या देशात ही सेवा खूप प्रभावी ठरू शकते. विशेषत: आपत्कालीन समस्यांमध्ये लोक अशी सेवा सहजपणे वापरू शकतील.. याशिवाय यामुळे रस्त्यांवरील भीषण वाहतूक कोंडीपासूनही दिलासा मिळेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)