Diwali 2021: असेही दिवाळी गिफ्ट! सुरतच्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटरची भेट; महागड्या इंधनापासून मिळणार दिलासा

2018 मध्ये त्यांनी आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कार तर 900 कर्मचाऱ्यांना एफडी भेट दिल्या होत्या. या सर्वांसाठी त्यांनी चक्क 50 करोड रुपये खर्च केला होता.

Diwali Gift (Photo Credit : Twitter)

भारतात आज दिवाळीचा (Diwali 2021) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. वर्षातील हा सर्वात मोठा उत्सव असल्याने त्याची धामधूमही तितक्याच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. दिवाळीच्या काळात काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना भेट किंवा बोनस (Diwali Gift) देतात. आता दिवाळीनिमित्त गुजरातमधील प्रमुख औद्योगिक शहर सुरत येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली दिवाळी भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooters) भेट दिल्या आहेत.

गुजरातचे व्यापारी दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना एकापेक्षा एक उत्तम अशा भेटवस्तू देतात. हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर खूश होऊन त्यांना कार, फ्लॅट आणि मोठ्या रकमेच्या एफडी भेट दिल्या होत्या. गुजरातमधील व्यापारी लक्ष्मीदास वेकारिया यांनी त्यांच्या 125 कर्मचाऱ्यांना स्कूटी भेट दिली होती. या यादीत आणखी एक उद्योगपती सुभाष दावर यांचे नाव जोडले गेले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, गुजरातमधील सुरत येथील कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट दिल्या आहेत. अलायन्स ग्रुपचे संचालक संचालक सुभाष दावर यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वेगाने वाढणाऱ्या किमती पाहता त्यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट दिल्या आहेत. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संचालक सुभाष दावर यांचा मुलगा चिराग याने सांगितले की, या दिवाळीत कंपनीने 35 कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर दिल्या आहेत. या पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक्सच्या बदल्यात देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये 'या' शेअर्सने मारली उसळी, सेन्सेक्स 60,078 अंकांवर तर निफ्टी 17916 अंकांवर झाला बंद)

दरम्यान, ‘हरे कृष्ण एक्सपोर्टचे’ चेअरमन सावजी ढोलकीया हे हिऱ्यांचे व्यापारी आहेत. 2018 मध्ये त्यांनी आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कार तर 900 कर्मचाऱ्यांना एफडी भेट दिल्या होत्या. या सर्वांसाठी त्यांनी चक्क 50 करोड रुपये खर्च केला होता. 2016 मध्ये त्यांनी आपल्या 1761 कर्मचा-यांना गाड्या, सदनिका आणि दागिने भेट म्हणून दिल्या होत्या.