Devendra Fadnavis at MHA: महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणांची चौकशी सीबीआयद्वारे करा, अन्यथा कोर्टात जाऊ- देवेंद्र फडणवीस
गरज पडल्यास आम्ही कोर्टातही जाणार आहोत.
महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) बदल्यांमध्ये होत असलेले व्यवहार आणि इतर प्रकरणांतील सर्व माहिती पुराव्यांसह केंद्रीय गृहसचिवांना दिली. गृहसचिवांनी प्राप्त माहिती पडताळून कारवाई करु असे अश्वासन दिल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहसचिवांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होतो. या वेळी त्यांनी या प्रकरणाची सीबआयद्वारे (CBI) चौकशी करावी असेही म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पोलिसांच्या बदल्यांप्रकरणात होत असलेल्या व्यवहारांबाबत आम्ही केवळ गृहसचिवांना भेटून थांबणार नाही आहोत. गरज पडल्यास आम्ही कोर्टातही जाणार आहोत. महाराष्ट्रातील सरकार कोणाला पाठिशी घालत आहे. पोलीस दलात बदल्यांबाबत होत असलेले व्यवहार पाहता मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलायला हवे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी म्हटले. (हेही वाचा, Devendra Fadnavis's Press Conference: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केले गंभीर आरोप; वाचा सविस्तर)
राज्याती आयपीएस अधिकारी हे केंद्र सरकारशी संबंधित असतात. त्यामुळे केंद्र सरकारनेच या बदल्यांबाबत कारवाई करणे आपेक्षीत आहे. त्यामुळेच आम्ही आज केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतल्याचे फडणवीस म्हणाले. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये होणाऱ्या व्यवहार प्रकरणाची चौकशी सीबीआय द्वारे व्हावी अशीहमागणी फडणवीस यांनी केली. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळेच आपण या प्रकरणातील माहिती सार्वजनिक करत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या भेटीदरम्यान दिलेल्या माहिती, कागदपत्रांबाबत एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, फडणवीस यांनी 'पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फोन टॅपींग या संदर्भात चारत असलेल्या कथीत रॅकेटचा 6.3 GB डेटा' केंद्रीय गृहसचिवांना दिली आहे.