डेरा सच्चा सौदाचा प्रमुख Ram Rahim Singh ला मिळाली Z-Plus सुरक्षा; 21 दिवसांसाठी फर्लोवर आहे तुरुंगाबाहेर

निवडणुकीपूर्वी मिळालेल्या फर्लोवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत हरियाणा सरकारला घेरले होते. डेरा सच्चा सौदाचे पंजाब आणि उत्तर प्रदेश या निवडणूक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आहेत

आरोपी राम रहीम ( File Photo)

डेरा सच्चा सौदा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग (Ram Rahim) याची हरियाणातील तुरुंगातून 21 दिवसांच्या 'फर्लो'वर सुटका करताना, झेड प्लस सुरक्षा (Z-Plus Security) देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 7 फेब्रुवारी रोजी सुटका झाल्यानंतर सिंग याला उच्च दर्जाची सुरक्षा देण्यात आली. सिंग याच्या जीवाला खलिस्तान समर्थक घटकांकडून धोका असल्याने ही सुरक्षा प्रदान केली जात आहे. राम रहीमला काही अटींसह फर्लो देण्यात आला आहे. यामध्ये त्याला जाहीर सभा घेता येणार नाहीत, तसेच त्याच्या आश्रमात भाविकांची गर्दी होऊ शकत नाही, यासोबतच तो परवानगी घेऊनच शहर सोडू शकतो.

हरियाणाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वतीने रोहतक रेंज कमिशनर सांगितले की, ‘जर कैद्याला पॅरोलवर बाहेर सोडले तर, सध्याच्या नियमांनुसार त्याला झेड-प्लस सुरक्षा किंवा समतुल्य सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते, कारण भारत आणि परदेशातील कट्टर शीख अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणावर धोका आहे. डेरामुखी गुरमीत राम रहीम 7 फेब्रुवारीपासून सुटीवर आहे आणि या काळात तो गुरुग्राममध्ये आपल्या तंबूत कुटुंबासह राहत आहे. 23 फेब्रुवारी रोजी गुरमीतला जामीन देण्याच्या विरोधात हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

राम रहीमने 31 जानेवारी रोजी रोहतकच्या सुनारिया कारागृहाच्या अधीक्षकांना पत्र लिहून तीन आठवड्यांच्या फरलोची मागणी केली होती आणि गुरुग्राममध्ये कुटुंबासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. राम रहीमच्या म्हणण्यानुसार, तो 4 वर्षे 4 महिन्यांपासून तुरुंगात आहे आणि कुटुंबाला भेटण्यासाठी त्याला 21 दिवसांची फर्लो रजा हवी आहे. राम रहीमने तुरुंगात शिक्षा भोगत असताना कोणताही गुन्हा केलेला नाही आणि तो कट्टर गुन्हेगाराच्या श्रेणीत येत नाही, त्यामुळे त्याच्या फर्लोची शिफारस करण्यात आली आहे.

सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी डेरा प्रमुख 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने सिंग याला दोषी ठरवले होते. (हेही वाचा: मोदी सरकारची मोठी कारवाई, सिख फॉर जस्टिस संबंधित App, बेवसाइट आणि सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक)

दरम्यान, पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राम रहीम 21 दिवसांच्या सुट्टीवर आहे. निवडणुकीपूर्वी मिळालेल्या फर्लोवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत हरियाणा सरकारला घेरले होते. डेरा सच्चा सौदाचे पंजाब आणि उत्तर प्रदेश या निवडणूक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. मात्र, सीएम खट्टर म्हणाले होते की, राम रहीमला दिलेल्या दिलासाचा पंजाब निवडणुकीशी काहीही संबंध नाही.