Delta Variant Mutations: देशात डेल्टा व्हेरियंटचे तब्बल 17 म्युटेशन्स; केंद्र सरकारची माहिती
दिवसेंदिवस या व्हेरियंटची प्रकरणे वाढत असून, यामुळे अजून चिंता वाढली आहे.
देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट कमी होतेय न होतेय तोपर्यंत कोविड-19 च्या डेल्टा प्लस व्हेरियंटने (Delta Plus Variant) धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस या व्हेरियंटची प्रकरणे वाढत असून, यामुळे अजून चिंता वाढली आहे. यामध्ये केंद्राने मंगळवारी सांगितले की, डेल्टा व्हेरियंट, ज्याला सार्स सीओव्ही-2 (SARS-CoV-2) B.1.617 म्हणूनदेखील ओळखले जाते, त्याचे सुमारे 15 ते 17 म्युटेशन्स असू शकतात. ऑक्टोबर 2020 मध्ये भारतात प्रथम नोंद झालेल्या डेल्टा व्हेरियंटचे तीन उपप्रकार आहेत.
यामध्ये B.1.617.1, B.1.617.2 आणि B.1.617.3. समाविष्ट आहेत. यापैकी पहिले आणि तिसरे रूप फक्त अभ्यासासाठी दखल घेण्यापुरते (Variant of Interest) आहे, मात्र दुसरा व्हेरियंट म्हणजेच डेल्टा प्लस हा चिंताजनक व्हेरियंट (Variant of Concern) आहे. डेल्टा व्हेरियंटपेक्षा डेल्टा प्लस हा अधिक तीव्र आणि अत्यंत संसर्गक्षम व्हेरियंट आहे. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात 51 डेल्टा प्लसच्या केसेस आढळल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.
पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणाले की, महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे नवे 14 रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे राज्यात डेल्टा प्लसच्या संक्रमितांचा आकडा 34 झाला आहे. रत्नागिरीमध्ये 3 मुलांनी डेल्टा प्लस प्रकारावर मात केली आहे. ही मुले तीन, चार आणि सहा वर्षांची आहेत. ही सर्व मुले रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील आहेत. महाराष्ट्रात या व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (हेहे वाचा: Cytomegalovirus: कोरोना विषाणू संसर्गाचा आणखी एक दुष्परिणाम; विष्ठेद्वारे होत आहे रक्तस्त्राव, 5 रुग्णांमध्ये दिसली ‘सायटोमेगालोव्हायरस’ची लक्षणे)
कोरोनाच्या डेल्टा प्रकाराबद्दल देश आणि जगात चिंता व्यक्त केली जात आहे. त्याच्यावरील लसीच्या परिणामाबाबतही चर्चा होत आहे. अशात बातमी आली आहे की, रशियन लस स्पुतनिक-व्ही ही डेल्टा व्हेरियंटवर 90 टक्के प्रभावी आहे. रशियाच्या गामालेया संस्थेचे उपसंचालक डेनिस लोगुनोव यांनी ही माहिती दिली आहे. या संस्थेने स्पुतनिक-व्ही तयार केली आहे.