IPL Auction 2025 Live

Delhi Shocker: व्यक्तीने पटना येथून 70,000 रुपयांना विकत घेतली पत्नी; नंतर हत्या करून जंगलात फेकून दिला मृतदेह, पोलिसांकडून अटक

मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना एका ऑटोरिक्षाची हालचाल संशयास्पद वाटली.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महिलांविरोधातील गुन्ह्यांची एक धक्कादायक घटना दिल्लीतून (Delhi) समोर आली आहे. या ठिकाणी एका व्यक्तीने बिहारच्या पटणा (Patna) येथून ‘विकत’ घेतलेल्या पत्नीची हत्या केली आहे. वृत्तानुसार, हा पुरुष आपल्या पत्नीच्या वागण्यावर रागावला होता. या व्यक्तीने दावा केला की, ती त्याला कोणतीही माहिती न देता घरातून पळून जायची आणि अनेक महिने दूर राहायची. या घटना वारंवार होऊ लागल्यावर एके दिवशी त्याने चिडून पत्नीची हत्या केली. आता या व्यक्तीसह त्याला या हत्येत मदत करणाऱ्या आरोपीसह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

माहितीनुसार या व्यक्तीने 70,000 रुपयांना पटना येथून आपल्या पत्नीला विकत घेतले होते. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या फतेहपूर बेरी येथील वनक्षेत्रात आपल्या दोन मेहुण्यांच्या मदतीने तिचा मृतदेह फेकून दिला. पतीचे नाव धरमवीर असे असून त्याच्या मेहुण्यांची नावे अरुण आणि सत्यवान असे आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी (9 ऑगस्ट) या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूर बेरीच्या जंगलातून पोलिसांना एक अनोळखी मृतदेह सापडला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना एका ऑटोरिक्षाची हालचाल संशयास्पद वाटली. रात्री 1.40 च्या सुमारास जंगल परिसरात ही ऑटोरिक्षा दिसली होती. त्यानंतर पोलिसांनी ऑटोरिक्षाचा माग काढला आणि अरुण याचा चालक असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (हेही वाचा: Bengaluru Uber Driver Attacks Woman: उबर कॅब चालकाचा महिलेवर हल्ला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

ऑटोरिक्षाचालक अरुणच्या कबुलीनंतर पोलिसांनी अन्य दोन आरोपी धरमवीर आणि सत्यवान यांना अटक केली. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितले की, त्यांनी धरमवीरची पत्नी स्वीटीची हत्या केली आणि तिचा मृतदेह हरियाणा सीमेजवळील फतेहपूर बेरीच्या जंगलात फेकून दिला.