दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोना विषाणूची लागण; रुग्णालयात उपचार सुरु

इतकेच नाही काही मंत्र्यांनाही या रोगाचे संक्रमण झाले आहे. अशात आता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Delhi Health Minister Satyendar Jain) यांची कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आली असल्याची माहिती मिळत आहे.

Satyendar Jain | Image: PTI

सध्याच्या कोरोना विषाणू (Coronavirus) संकटकाळात अनेक डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार यांना या विषाणूची लागण झाली आहे. इतकेच नाही काही मंत्र्यांनाही या रोगाचे संक्रमण झाले आहे. अशात आता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Delhi Health Minister Satyendar Jain) यांची कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आली असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली. मंगळवारी देखील जैन यांची कोरोना विषाणू तपासणी झाली होती व त्यावेळी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला होता. तीव्र ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर, त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

पहा ट्वीट-

लक्षणांच्या आधारे जैन यांना कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती होती. मंगळवारी सकाळी त्यांची चाचणी घेण्यात आली यानंतर त्यांची दुसर्‍यांदा कोरोना टेस्ट झाली आणि त्यामध्ये रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. सोमवारी अचानक त्यांची ऑक्सिजनची पातळी खाली आली होती. या 55 वर्षीय आप नेत्याच्या आधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली होती. मात्र, त्यांचा अहवाल नकारात्मक आला होता. मुख्यमंत्र्यांना ताप आणि घशात दुखण्याची तक्रार होती. हा अहवाल येण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून केजरीवाल यांनी स्वत: ला वेगळे ठेवले होते.

(हेही वाचा: कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना क्वारंटाईन सुविधा आणि वेळेत पगार मिळायला हवा: सर्वोच्च न्यायालय)

यापूर्वी आज कालका जी विधानसच्या आम आदमी पक्षाच्या आमदार आतिशी यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी आली होती. बुधवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वतःला घरातच वेगळे ठेवले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळपर्यंत दिल्लीत कोरोना विषाणूमुळे एकूण 1837 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्लीत 16500 हून अधिक साथीचे रुग्ण बरे झाले आहेत. सध्या इथे एकूण 26351 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.