दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असलेल्या लोक कल्याण मार्ग परिसरातील एलकेएम कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीवर नियंत्रण
ही घटना सोमवारी (30 डिसेंबर 2019) सायंकाळी 7.25 च्या सुमारास घडली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दिल्ली येथील निवासस्थान (Prime Minister's residence) परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (30 डिसेंबर 2019) सायंकाळी 7.25 च्या सुमारास घडली. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटनुसार ही आग राजधानी दिल्ली (Delhi) येथील लोककल्याण मार्ग ( Lok Kalyan Marg) परिसरात लागली. पंतप्रधानांना पुरविण्यात येणाऱ्या एसपीजी (Special Protection Group) कार्यालय नजिक असलेल्या एलकेएम कॉम्लेक्स (LKM complex) येथे शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठई शर्थीचे प्रयत्न केले. राजधानी दिल्ली येथील सात, लोककल्याण मार्ग येथे पंतप्रधान मोदी यांचे शासकीय निवासस्थान आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही आग अगदीच किरकोळ स्वरुपाची होती. मात्र, पंतप्रधान निवासस्थान असल्याने या मार्गावर नेहमीच रहदारी असते. विविध नेते, पक्ष कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकही या निवासस्थानानजिकच्या रस्त्याने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात त्यामुळे आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पीएमओ ट्विट
एएनआय ट्विट
दरम्यान, पंतप्रधानांचे निवासस्थान असल्याने या ठिकाणी नेहमीच कडेकोट बंदोबस्त ठेवलेला असतो. तसेच, सुरक्षेसाठी आवश्यक अशी सर्व सामग्री, अत्याधुनिक यंत्रणाही सदैव तत्पर असते. त्यामुळे अशा प्रकारची अनुचीत घटना शक्यतो घडत नाही. अशा घटना घडण्यापूर्वीच त्यावर सुरक्षा यंत्रणा नियंत्रण मिळवत असते. मात्र, कधी कधी अपवादात्मक स्थितीत अनुचीत प्रकार घडतो. अशा घटनांवर तातडीने उपायोजना करुन तत्परतेने नियंत्रण मिळवले जाते, असे एका मदत आणि बचाव कार्य अभ्यासकाने सांगितले.