IPL Auction 2025 Live

धक्कादायक! स्वस्त दरात कांदा खरेदीसाठी रांगेत उभा राहिलेल्या वृद्धाचा मृत्यू

तसेच तामिळनाडूमधील एका मोबाइल शॉपनेदेखील एक भन्नाट ऑफर आणली होती. आपल्या दुकानातून फोन खरेदी केल्यास भेट म्हणून एक किलो कांदा देण्यात येईल

Onions (Photo Credits: IANS)

सध्या कांद्याचे भाव (Onion Price) गगनाला भिडले आहेत. सामान्य जनतेचे खिसे कांदा खरेदी करण्यात रिकामे होत आहेत. याबाबत संसदेमध्येही चर्चा होत आहेत. अशात काही कंपन्या आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी या गोष्टीचा फायदा करून घेत आहेत. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये स्वस्त दरात कांदे विकले जात होते. तसेच तामिळनाडूमधील एका मोबाइल शॉपनेदेखील एक भन्नाट ऑफर आणली होती. आपल्या दुकानातून फोन खरेदी केल्यास भेट म्हणून एक किलो कांदा देण्यात येईल अशी ही ऑफर होती. आता आंध्र प्रदेशचे स्टेट मार्केटिंग डिपार्टमेंट लोकांना स्वस्त कांदे उपलब्ध करून देत आहे. मात्र या स्वस्त कांद्यासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेशचे स्टेट मार्केटिंग डिपार्टमेंट जनतेला थेट शेतकऱ्यांकडून कांदा उपलब्ध करून देत आहे. बाजारात कांदा 100 ते 180 रुपयांना प्रतिकिलो विकला जात आहे, तर या सुविधेअंतर्गत कांदा 25 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. स्वस्त कांद्यासाठी लोक मोठ्या संख्येने इथे पोहचले आहेत. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी 60 वर्षीय साम्भाय रेड्डीदेखील आले होते. मात्र दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर ते अचानक जमिनीवर पडले. लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा: अबब! सोनाराच्या दुकानात कांद्याची विक्री; दागिने, आधार कार्ड तारण ठेऊन लोकांची कांदा खरेदी)

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हा नैसर्गिक मृत्यू असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) आंध्र प्रदेश विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यासाठी परवानगी मिळाली नाही. टीडीपीचे प्रमुख चंद्र बाबू नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वस्त कांद्यासाठी रांगेत उभा राहिल्यानेच रेड्डी यांचा मृत्यू झाला आहे.