सोनाराच्या दुकानात कांदा (Photo Credit : ANI)

देशभरात कांद्याची (Onion) किंमत आकाशाला भिडत आहे. बाजारात प्रति किलो कांदा 100 ते 110 रुपये दराने उपलब्ध आहे. कांदे महाग झाल्यामुळे जेवणाची चवही खराब झाली आहे. यामुळेच सध्या कांद्यावर राजकारण सुरू झाले आहे. कांद्यावरून विरोधी पक्ष सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या पार्श्वभूमीवर समाजवादी युवा सभेतील कामगार चक्क कर्जावर कांदा देत आहेत. वाराणसीच्या सुंदरपूर येथील दागिन्यांच्या दुकानात कर्जावर कांदा दिला जात आहे. महिला आपले दागिने गहाण ठेऊन कांदा कर्जावर घेत आहेत. हा प्रकार म्हणजे जनतेकडून कांदा दरवाढीचा निषेध आहे.

एएनआय ट्वीट -

समाजवादी पक्षाच्या युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चालवलेल्या काही दुकानांवर आधार कार्ड तारण ठेऊन कांदा कर्ज स्वरूपात दिला जात असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही तर कांदा चक्क तिजोरीत बंद करून ठेवला गेला आहे. याबाबत बोलताना एका समाजवादी कार्यकर्त्याने सांगितले की, 'आम्ही कांद्याच्या महागाईचा अशा प्रकारे निषेध करत आहोत. आम्ही आधार कार्ड किंवा दागिने गहाण ठेवून कांदा देत आहोत.'

कांद्याची महागाई रोखण्यासाठी सरकारने 1.2 लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु दिल्लीतील आझादपूर बाजाराचे व्यापारी आणि कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'देशात दररोज सुमारे 50,000-60,000 टन एवढ्या कांद्याची उलाढाल होते. अशा परिस्थितीत परदेशातून 1.2 लाख टन कांदे आल्यावर ते फक्त दोन दिवसच पुरतील.' (हेही वाचा: मोबाईल नंबर लिंक करुन स्वस्त दरात विकला कांदा, प्रति यूजर दोन किलोपेक्षा अधिक मिळणार नाही)

दरम्यान, सर्वसामान्यांना काही दिलासा मिळावा म्हणून बिहार राज्य सहकारी विपणन असोसिएशन लिमिटेड (BISCOMAUN) गेल्या काही दिवसांपासून लोकांना स्वस्त दरात कांदा पुरवित आहे. हा कांदा 35 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे हा कांदा घेण्यासाठी लोक हजोरोंच्या संख्येने येत आहेत. अशात काल इथे कांद्यासाठी मारामारी झाल्याचेही पाहायला मिळाले.