Deadly Honeymoon: हनिमूनसाठी बालीला गेलेल्या चेन्नईच्या नवविवाहित जोडप्याचा मृत्यू; फोटोशूट करताना तोल जाऊन पडले पाण्यात
कुटुंबीय आता त्यांचे मृतदेह चेन्नईला आणण्याची व्यवस्था करत आहेत. इंडोनेशियातील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून त्यांनी तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
लग्नाच्या अवघ्या आठवडाभरातच बाली (Bali) येथे हनिमूनसाठी (Honeymoon) गेलेल्या चेन्नईतील (Chennai) डॉक्टर जोडप्याचा (Doctor Couple) शुक्रवारी बुडून मृत्यू झाला. नवविवाहित जोडपे स्पीडबोटवर फोटोशूट करत होते. यादरम्यान त्यांचा तोल गेला आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. पती-पत्नींचे मृतदेह भारतात आणण्यासाठी त्यांचे कुटुंबीय बाली येथे पोहोचले आहेत. पूनमल्ली (Poonamallee) येथील लोकेश्वरन आणि विबुशनिया अशी मृतांची नावे आहेत. दोघांचा विवाह 1 जून रोजी झाला होता.
माहितीनुसार, पुंतमल्ली सेनिरकुप्पमजवळ (Seneerkuppam) राहणारी सेल्वम यांची मुलगी विबुशनिया (Vibushniya) (25) ही डॉक्टर म्हणून काम करत होती. विबुशनिया आणि सालेम जिल्ह्यातील डॉक्टर लोकेश्वरन (Lokeshwaran) यांचे प्रेम होते. दोघांनीही आपल्या घरी एकमेकांबद्दल सांगितल्यावर कुटुंबियांनी लग्नाला होकार दिला. त्यानंतर 1 जून रोजी विभूषणिया आणि लोकेश्वरन यांचा पुणतामल्ली येथील एका लग्नमंडपात मोठ्या थाटामाटात विवाह झाला.
काही दिवसांपूर्वी नवविवाहित जोडपे इंडोनेशियातील बाली येथे हनिमून साजरा करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर मोटर बोटमध्ये फोटोशूट करत असताना अचानक तोल गेल्याने दोघेही बुडाले. शुक्रवारी लोकेश्वरन यांचा मृतदेह सापडला, तर शनिवारी सकाळी विभूषणियाचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती देताना बालीचे अधिकारी सांगतात की, याचा केवळ प्राथमिक तपास झाला आहे, ज्यामध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची पुढील चौकशी सुरु आहे. (हेही वाचा: चेन्नईच्या उद्योगपतीने आपल्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ बांधला मिनी ताजमहाल; जाणून घ्या किती खर्च आला)
हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबीय आता त्यांचे मृतदेह चेन्नईला आणण्याची व्यवस्था करत आहेत. इंडोनेशियातील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून त्यांनी तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. इंडोनेशिया ते चेन्नई थेट विमानसेवा नसल्याने मृतदेह तामिळनाडूत आणण्यापूर्वी मलेशियाला नेले जातील.