Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचे रौद्र रुप; महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना अधिक तडाख्याची शक्यता

याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली आहे.

Cyclone | Representational Image (Photo Credits: PTI)

अरबी समुद्रात घोंगावणारं तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) रौद्र रुप धारण करत आहे. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली आहे. काही वेळातच या चक्रीवादळाचा वेग 175 किमी प्रति तास इतका होऊ शकतो. तौक्ते चक्रीवादळाचे केंद्रस्थान गोवा-पणजीपासून 150 किमी, मुंबईपासून 490 किमी तर गुजरातपासून 730 किमी अंतरावर आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर वादळ 18 मे रोजी धडकण्याची शक्यता आहे. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि महुवा येथून जाण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. चक्रीवादळ अतितीव्र झाल्याने  महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना अधिक तडाखा बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये वर्तवण्यात आली आहे.

नेव्ही (Navy), आयएएफ (IAF), एनडीआरएफ (NDRF), एसडीरएफ (SDRF) टीम्स किनारपट्टीकडील राज्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत देखील आज दुपारपासून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे, दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला भारतीय हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्च स्तरीय बैठक घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रशासनाला सर्तकतेचा इशारा दिला आहे. तसंच मुंबई पालिका प्रशासन देखील सज्ज असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 580 कोविड सेंटर्स मधील रुग्णांना काल रात्रीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. (Cyclone Tauktae जाणून घ्या वादळाचा मार्ग, वाऱ्याचा वेग व त्याची तीव्रता)

Cyclone Tauktae Live Tracker Map on Windy:

सिंधुदुर्ग मध्ये कालपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईत या परिसरातही वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. आज दुपारपर्यंत चक्रीवादळ रत्नागिरीच्या सुमद्री हद्दीत प्रवेश करेल, अशी माहिती मिळत आहे.