CRPF Constable Recruitment 2023: आजपासून सुरु झाली 9,212 कॉन्स्टेबल पदांची भरती प्रक्रिया; 10 वी पासही करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर
उमेदवारांची निवड 1 ते 13 जुलै 2023 या कालावधीत होणाऱ्या संगणक आधारित चाचणीच्या आधारे केली जाईल.
दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) सामील होण्याची तयारी करतात. अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून सीआरपीएफ भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. सीआरपीएफला कॉन्स्टेबलची गरज आहे, त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. सीआरपीएफने कॉन्स्टेबलच्या 9,212 पदांसाठी अर्ज मागवले आहेत व यासाठी 27 मार्च, सोमवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
तुम्ही सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर जाऊन नोकरीसाठी अर्ज करू शकता. उमेदवारांची निवड 1 ते 13 जुलै 2023 या कालावधीत होणाऱ्या संगणक आधारित चाचणीच्या आधारे केली जाईल. संगणक आधारित चाचणीसाठी प्रवेशपत्र 20 जून रोजी जारी केले जाईल. उमेदवार 25 जूनपासून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.
अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत कॉन्स्टेबलच्या एकूण 9,212 पदांची नियुक्ती केली जाईल. यापैकी 9,105 पदांसाठी पुरुष उमेदवारांची भरती केली जाणार आहे, तर 107 पदांवर महिलांची नियुक्ती केली जाणार आहे. तरुणांना अधिसूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. अधिसूचनेमध्ये तरुणांना शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी यासह सर्व माहिती मिळणार आहे. कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी उमेदवार किमान मॅट्रिक पास असणे आवश्यक आहे. याशिवाय ड्रायव्हर पदांसाठी वयोमर्यादा 21 ते 27 वर्षे, तर इतर पदांसाठी 18 ते 23 वर्षे आहे.
(हेही वाचा: EPFO Interest Rate: कर्मचाऱ्यांना उद्या मिळणार खुशखबर! EPFO 2022-23 आर्थिक वर्षासाठी व्याजदरात वाढ करण्याची शक्यता)
लेखी चाचणीनंतर, निवडलेल्या उमेदवारांना शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), व्यापार चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल. सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी लेखी परीक्षेसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. एससी/एसटी उमेदवार, माजी सैनिक आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 21,700 रुपते ते 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळेल. प्रत्येक पदासाठी पात्रता निकष, वयोमर्यादा इत्यादी भिन्न आहेत.