Cow Dung Therapy: काय सांगता? Covid-19 पासून दूर राहण्यासाठी शेणाने व गोमुत्राने अंघोळ; डॉक्टरांनी वर्तवला Mucormycosis संसर्गाचा धोका (Watch Video)

कोविड-19 विरूद्ध रोग प्रतिकारशक्ती वाढवते असा विश्वास ठेवून लोकांचा एक छोटासा समूह अहमदाबादमधील श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठानम द्वारा राबविण्यात येणाऱ्या गायीच्या गोठ्याला भेट देत आहे. या ठिकाणी 200 पेक्षा जास्त गायी आहेत

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Getty Images)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेमुळे संपूर्ण देशातील स्वास्थ्य बिघडले आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढत आहे. आजकाल तर ऑक्सिजन व रुग्णालयात बेड्सच्या कमतरतेमुळे संपूर्ण देशात आपत्कालीन स्थिती आहे. अशा परिस्थितीत, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत ते घरीच राहून स्वत: उपचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक घरगुती उपायांना ऊत आला आहे. सोशल मीडियावर असे बरेच व्हिडिओ आहेत जे कोरोनाविरूद्ध संरक्षण करण्याचे चुकीचे आणि दिशाभूल करणारे मार्ग सांगतात. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये चक्क गायीच्या शेणाने स्नान होत असलेले दिसत आहे.

अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक आपल्या अंगाला शेण घासून त्याने अंघोळ करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शन यादव म्हणतात, 'आता हसावे की रडावे’. हा व्हिडिओ गुजरातमधील अहमदाबादचा असल्याचे सांगितले जात आहे. शेणाने अंघोळ केल्यावर कोरोना दूर राहील असा समज असल्याने हे लोक शेणाने अंघोळ करीत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मात्र, डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी कोविड-19 च्या वैकल्पिक उपचारांविरूद्ध वारंवार चेतावणी दिली आहे की, ते सुरक्षिततेची खोटी भावना निर्माण करू शकतात. तसेच पुढे आरोग्याच्या समस्या अधिक जटिल बनवू शकतात. इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख डॉ. जे ए जयलाल म्हणाले, 'कोविड-19  च्या विरोधात शेण किंवा गोमुत्र रोग प्रतिकारशक्ती वाढवते असे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर राज्यातील डॉक्टरांनी या उपचाराविरूद्ध चेतावणी दिली आहे. ते म्हणाले आहेत की, अशा प्रकारच्या ‘थेरपी’मुळे Mucormycosis सारखा संसर्ग होण्याचा धोका आहे. (हेही वाचा: Covid-19 उपचारामध्ये Plasma Therapy ठरतेय कुचकामी? आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली चिंता, ICMR लवकरच घेणार निर्णय)

दरम्यान, कोविड-19 विरूद्ध रोग प्रतिकारशक्ती वाढवते असा विश्वास ठेवून लोकांचा एक छोटासा समूह अहमदाबादमधील श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठानम द्वारा राबविण्यात येणाऱ्या गायीच्या गोठ्याला भेट देत आहे. या ठिकाणी 200 पेक्षा जास्त गायी आहेत. गेल्या एका महिन्यापासून, दर रविवारी सुमारे 15 व्यक्ती शेण व गोमुत्राने अंघोळ करण्यासाठी इथे येत आहेत. महत्वाचे म्हणजे थेरपी घेत असलेल्यांमध्ये काही फ्रंटलाइन वर्कर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारे लोकही सामील आहेत. डॉक्टर मात्र याच्या प्रभावीतेची ग्वाही देत नाहीत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now