Omicron Variant: कोरोनाचा नवा स्ट्रेन 'ओमिक्रॉन'; जगभरात चिंता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बोलावली बैठक
'ओमिक्रॉन' (Omicron Variant) असे कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनचे नाव आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट जगभरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावणार की काय? अशी चिंता आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग देशभरात कमी आला असला तरी जगभरातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. प्रामुख्याने दक्षिण अफ्रीका देशात आलेला कोरनाचा नवा व्हेरीएंट (New Covid Strain) जगासमोर पुन्हा एकदा चिंता निर्माण करणारा ठरतो आहे. 'ओमिक्रॉन' (Omicron Variant) असे कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनचे नाव आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट जगभरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावणार की काय? अशी चिंता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरनाचा नवा व्हेरीएंट आणि देशातील एकूण लसीकरण याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोविड-19 लसीकरण अभियान डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधानांनी आज सकाळी साडेदहा वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. (हेही वाचा, न्यूयॉर्कमध्ये ओमिक्रॉन नवीन व्हायरसच्या चिंतेत केली आणीबाणीची घोषणा)
दक्षिण अफ्रीकेत कोविड-19 च्या नव्या रुपायत आढळलेल्या व्हेरिएंटने जगासमोरील चिंता वाढवली आहे. जगभरातील अनेक देशांनी या व्हेरिएंटवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या एका समितीने कोरोना व्हायरसच्या या नव्या रुपास ‘ओमीक्रॉन' असे नाव दिले आहे. हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक आणि चिंताजनक असल्याचेही म्हटले आहे.
ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, रशिया आणि इतरही अनेक देशांसोबत यूरोपीय संघाने आफ्रिकी देशांतून येणाऱ्या लोकांवर प्रतिबंध लावले आहेत.
भारतात कोरोना व्हायरस संक्रमितांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. पाठिमागील 24 तासात संपूर्ण भारतात 8,318 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. एकेकाळी हा आकडा दीड ते दोन लाखांच्या आसपास असायचा. भारतातील कोरोना व्हायरस संक्रमितांची बरे होण्याची संख्याही जवळपास 3,39,88,797 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाबाबत सकारात्मक गोष्टी पुढे येत असतानाच नव्या व्हेरिएंटने चिंता निर्माण केली आहे.