COVID-19 Vaccine: मोठा निर्णय, 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे होणार कोरोना लसीकरण; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती
त्यामुळे सरकारच्या वतीने अवाहन आहे की, 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींनी कोरोना लस घेण्यासाठी नावनोंदणी करावी.
देशात वाढत्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमनाबाबात केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण ( COVID-19 Vaccine) केले जाणार आहे. म्हणजेच या नागरिकांना कोविड 19 लस दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar ) यांनी ही माहिती दिली. जावडेकर यांनी सांगितले की, देशात लसीकरणासाठी योग्य प्रमाणात लस उपलब्ध आहे. लसीची कोणत्याही प्रकारे कमी नाही.
प्रकाश जावडेकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, येत्या एक एप्रिलपासून देशातील 45 वर्षे पूर्ण असलेल्या सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने अवाहन आहे की, 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींनी कोरोना लस घेण्यासाठी नावनोंदणी करावी. (हेही वाचा, Ahmedabad: कोरोनाची लागण झालेल्या नर्स महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार; पतीसह सासरच्या लोकांविरोधात खोखरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)
देशात कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट निर्माण झाली आहे. ही लाट वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोरोना लसीकरणावर भर देताना दिसत आहे. देशात कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशात आतापर्यंत 4.72 कोटी नागरिकांना कोरोना लस दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी (22 मार्च) सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोना लसीचे साधारण 4,72,07,134 इतके डोस देण्यात आले.