COVID-19 Vaccine: आतापर्यंत कोरोना विषाणू लसीचे 44 लाख डोस गेले वाया, तामिळनाडू आघाडीवर; RTI मधून धक्कादायक बाब समोर 

तामिळनाडूमध्ये सर्वाधिक म्हणजे 12.10% डोस वाया गेले आहेत. त्याखालोखाल हरियाणा (9.74%), पंजाब (8.12%), मणिपुर (7.8%) आणि तेलंगाना (7.55%) आहे.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेमुळे लोकांची चिंता वाढली आहे. लोक औषधे, उपचार आणि लसीसाठी भटकत आहेत. देशात कोविड-19 च्या लसीच्या (COVID-19 Vaccine) कमतरतेमुळे लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. आता लसीचे उत्पादन वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे. दुसरीकडे आरटीआयच्या माहितीमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आतापर्यंत देशात 44 लाखांपेक्षा जास्त लसींचे डोस वाया गेले आहेत. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारीत सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेमध्ये 11 एप्रिलपर्यंत 44 लाखाहून अधिक डोस वाया गेले आहेत.

11 एप्रिल पर्यंत, राज्यांनी वापरलेल्या 10 कोटी डोसमधील सुमारे 44 लाख डोस वाया गेले आहेत किंवा खराब झाले आहेत. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक म्हणजे 12.10% डोस वाया गेले आहेत. त्याखालोखाल हरियाणा (9.74%), पंजाब (8.12%), मणिपुर (7.8%) आणि तेलंगाना (7.55%) आहे. महत्वाचे म्हणजे आरटीआयमध्ये समोर आले आहे की, केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोरम, गोवा, दमण आणि दीव, अंदमान आणि निकोबार बेटे या ठिकाणी लसीचा एकही डोस वाया गेला नाही.

तज्ञांचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात लसीचे डोस वाया जाण्याचे कारण म्हणजे लोक लसीकरणासाठी कमी संख्येने येणे हे आहे. लसीच्या एका व्हायलमध्ये 10 ते 12 डोस असतात. कुपी उघडल्यानंतर ठराविक वेळेत (सुमारे अर्धा तास) ते डोस देणे गरजेचे असते नाहीतर ते डोस वाया जातात. (हेही वाचा: नवी दिल्लीहून आलेल्या फ्लाईटमध्ये 49 जण कोरोना पॉझिटिव्ह; हाँगकाँगने भारतातून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर घातली बंदी)

दरम्यान, देशात कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता, 1 मेपासून सरकारने 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्वांसाठी लसीकरणाची घोषणा केली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात लसींची आवश्यकता भासणार आहे. देशात लस बनविणार्‍या दोन कंपन्यांकडून ही मागणी पुरविणे शक्य नाही, त्यामुळे सरकारने परदेशी लस आणण्यास परवानगी दिली आहे.