दिलासादायक! पुढच्या महिन्यात येऊ शकते लहान मुलांसाठीची Covid-19 Vaccine; आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांची माहिती
तज्ञांचा असा विश्वास आहे की, कोरोनाची प्राणघातक साखळी तोडण्यासाठी मुलांचे लसीकरण एक मोठे पाऊल ठरेल. दुसरीकडे यामुळे देशभरातील सहाला पुन्हा सुरु होण्याची आशाही निर्माण झाली आहे
देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्या लाटेचा कहर हळूहळू कमी होत आहे. एकेकाळी देशात दररोज 4 लाख प्रकरणे नोंदवली जात होती, ती संख्या आता 30-40 हजारांच्या दरम्यान आली आहे. कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी सध्या भारतात तीन लस दिल्या जात आहेत. आणखी काही नवीन लस लवकरच येण्याची अपेक्षा आहे. या सर्वांच्या दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी मोठी माहिती दिली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, मनसुख मंडाविया म्हणाले आहेत की, ऑगस्ट महिन्यापासून लहान मुलांसाठीची लस येऊ शकते. आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी झालेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत ही माहिती दिली.
सध्या देशात केवळ 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच अँटी-कोरोना लस दिली जात आहे. यापूर्वी सप्टेंबरपर्यंत मुलांसाठी कोरोनाची लस येणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात होते. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देखील गेल्या आठवड्यात सांगितले होते की, सप्टेंबरपर्यंत मुलांसाठीच्या कोविड-19 लसीसाठी मान्यता दिली जाऊ शकते. डॉ. गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, हैदराबादस्थित भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन क्लिनिकल चाचणीचा डेटा सप्टेंबरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि जर तो सुरक्षित असल्याचे आढळले तर, त्याच महिन्यात मुलांसाठी ही लस मंजूर होऊ शकेल.
Zydus Cadila च्या मुलांसाठीच्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, कोरोनाची प्राणघातक साखळी तोडण्यासाठी मुलांचे लसीकरण एक मोठे पाऊल ठरेल. दुसरीकडे यामुळे देशभरातील सहाला पुन्हा सुरु होण्याची आशाही निर्माण झाली आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेत मुलांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.