Covid-19 Testing Scam: हरिद्वारच्या कुंभमेळ्यावेळी केल्या 1 लाखाहून अधिक खोट्या कोरोना विषाणू चाचण्या; एक फार्म व 2 लॅबोरेटरीवर FIR दाखल
यावेळी तब्बल 1 लाखाहून अधिक खोटे नकारात्मक कोरोना चाचणी अहवाल जारी करण्यात आले होते
याआधी आपण आर्थिक घोटाळे मोठ्या प्रमाणात पाहिले आहेत, मात्र आता हरिद्वारच्या कुंभमेळ्यादरम्यान (Haridwar Kumbh Mela) चक्क कोरोना विषाणू चाचणीमध्ये (Covid-19 Testing) मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. यावेळी तब्बल 1 लाखाहून अधिक खोटे नकारात्मक कोरोना चाचणी अहवाल जारी करण्यात आले होते. कुंभमेळ्याच्या काळात हरिद्वारचा कोरोना सकारात्मकता दर राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा खूपच कमी असल्याचे नोंदविण्यात आले. आयसीएमआरच्या सूचनेनुसार हरिद्वारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना चाचणीतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आता नैनीताल उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, खासगी लॅबने जास्तीत जास्त चाचण्या दर्शविण्यासाठी बनावट आधार कार्डच्या आधारे चाचण्या केल्या. 22 एप्रिल रोजी पंजाबच्या फरीदकोट येथील एलआयसी एजंट विपिन मित्तल यांना त्यांचा कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचा मेसेज आला होता. मात्र त्यांनी कधीच अशी चाचणी केली नसल्याने त्यांनी याबाबत तक्रार केली. विपिन यांनी आपली तक्रार इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे (ICMR) मेलद्वारे केली. त्यानंतर आयसीएमआरच्या तपासणीत विपिन यांचे कोविड नमुने हरिद्वारमध्ये घेतल्याचे निष्पन्न झाले. पुढे या प्रकरणाचा तपास उत्तराखंड आरोग्य विभागाकडे देण्यात आला.
आरोग्य सचिव अमित नेगी यांनी तपास सुरू केला, त्यात असे दिसून आले की केवळ विपिन मित्तलच नाही तर अशा एक लाख बनावट कोविड चाचण्या केल्या गेल्या आहेत. एकच घर क्रमांक आणि त्याच मोबाइल क्रमांकावर 50-60 लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका फर्मसह दोन खासगी लॅबवर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हरिद्वारच्या सीएमओच्या तक्रारीवरून मॅक्स कॉर्पोरेट सर्व्हिस, दिल्लीच्या लालचंदानी आणि हिसारच्या नालवा लॅबवर फसवणूकीसह इतर गुन्हे दाखल केले आहेत. (हेही वाचा: Mucormycosis च्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उचलली महत्वाची पावले)
12 आणि 14 एप्रिल रोजी हरिद्वारमध्ये कुंभची दोन मोठी शाही स्नाने झाली. त्यावेळी लाखो भाविक हरिद्वारमध्ये हजर होते. त्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने कोविड चाचणीसंदर्भात 22 प्रयोगशाळांसह करार केला होता. मॅक्स कॉर्पोरेट सर्व्हिसकडे त्यातील दोन प्रयोगशाळा होत्या. कुंभ दरम्यान 1 ते 30 एप्रिल रोजी दररोज 50 हजार चाचण्या करण्याचे निर्देश नैनीताल उच्च न्यायालयाने दिले होते. हेच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खोट्या चाचण्या केल्या गेल्या. आता या 22 लॅबद्वारे करण्यात आलेल्या हजारो चाचण्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
याबाबत सीएम रावत म्हणाले, ही बाब मी मुख्यमंत्री होण्यापूर्वीची आहे. पदभार स्वीकारताच मी त्याबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास चालू आहे, दोषी आढळलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल.