Covid-19 Endemic Stage: भारतामध्ये दीर्घकाळ राहील कोरोना विषाणूचा संसर्ग; देशातील लोकांना व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल- WHO ने दिला इशारा
स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, भारतात कोविड-19 महामारी ही ‘स्थानिक’ टप्प्यात (Endemic Stage) प्रवेश करत आहे
देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) प्रकरणे भलेही कमी होत असतील, परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) यांच्या वक्तव्याने पुन्हा चिंता वाढवली आहे. स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, भारतात कोविड-19 महामारी ही ‘स्थानिक’ टप्प्यात (Endemic Stage) प्रवेश करत आहे, जेथे कमी किंवा मध्यम पातळीवरील संसर्ग चालू आहे. एखाद्या महामारीचा स्थानिक टप्पा तेव्हा येतो जेव्हा त्या प्रदेशातील जनता व्हायरससह जगणे शिकते. हे एखाद्या साथीच्या टप्प्यापासून पूर्णपणे भिन्न आहे, जिथे विषाणू जनतेवर हावी होतो. याचा अर्थ भारताला कोरोनापासून मुक्त होण्यासाठी अजून बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल.
एका मुलाखतीत स्वामीनाथन म्हणाल्या की, आपण बहुधा स्थानिक पातळीवरील संसर्गाच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. मात्र यामध्ये आपल्याला याआधी पाहिल्या गेलेल्या धोकादायक संसर्गाचा सामना करावा लागणार नाही. स्वामीनाथन यांना भारतात अशी परिस्थिती का निर्माण होत आहे? असे विचारले असता, त्या म्हणाल्या की लोकसंख्येतील वैविध्य आणि भारताच्या विविध भागात रोग प्रतिकारशक्तीच्या स्थितीमुळे हे घडत आहे. ही अस्थिर परिस्थिती अशीच चालू राहण्याची शक्यता आहे.
त्यांनी आशा व्यक्त केली की 2022 च्या अखेरीस देशात 70 टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य केले जाऊ शकेल आणि त्यानंतर देशातील परिस्थिती सामान्य होईल. मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाबाबत स्वामीनाथन म्हणाल्या की, पालकांनी घाबरण्याची गरज नाही. आम्ही सीरो सर्वेक्षण पाहत आहोत आणि इतर देशांकडून जे शिकलो त्यातून हे स्पष्ट होत आहे की, मुलांना या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे परंतु बहुतेक मुलांमध्ये अतिशय सौम्य आजार दिसतील.
उपचारासाठी रेमडेसिविर, एचसीक्यू किंवा आयव्हरमेक्टिन सारख्या औषधांचा वापर करण्याबाबत त्या म्हणाल्या की, आतापर्यंत असे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत, जे सिद्ध करतील की एचसीक्यू किंवा आयव्हरमेक्टिनचा व्हायरसने संक्रमित लोकांमध्ये मृत्यू किंवा संसर्ग कमी करण्यात काही भूमिका आहे.