Covaxin आणि Covishield लसीचे मिक्स डोस अधिक परिणामकारक- ICMR

कोव्हॅसिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसींच्या मिश्रणाचे चांगले परिणाम दिसून आल्याचे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ने म्हटले आहे.

Covaxin & Covishield (Photo Credits: Wikimedia Commons)

कोव्हॅसिन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) या दोन्ही लसींच्या मिश्रणाचे चांगले परिणाम दिसून आल्याचे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (The Indian Council of Medical Research) ने म्हटले आहे. यासाठी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चुकून दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेतलेल्या व्यक्तीवर अभ्यास करण्यात आला. लसींचे मिश्रण केवळ सुरक्षित नसून चांगली इम्युनिटी दर्शवत असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

एकाच लसीचे दोन्ही डोसेसच्या परिणामांपेक्षा दोन वेगवेगळ्या लसींच्या मिक्स डोसचे परिणाम अधिक चांगले आहेत, असे अभ्यासातून दिसून आले आहे. देशातील लसीकरण मोहिमेअंतर्गत एकाच लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मात्र 18 जणांना चुकून कोविशिल्डचा पहिला आणि कोव्हॅसिनचा दुसरा डोस मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले. या अभ्यासात दोन वेगवेगळ्या लसींचे डोस मिळालेल्या व्यक्तींच्या सुरक्षितता आणि इम्युनिटीची तुलना एकाच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींशी करण्यात आली.

ANI Tweet:

या अभ्यासात दोन वेगवेगळ्या लसींचे डोस मिळालेल्या व्यक्तींच्या सुरक्षितता आणि इम्युनिटीची तुलना एकाच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींशी करण्यात आली. या अभ्यासातून असे दिसून आले की, कोविड-19 च्या अल्फा, बिटा आणि डेल्टा वेरिएंटविरुद्ध दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेतलेल्या व्यक्तींची इम्युनिटी चांगली होती. (संशोधनात मोठा खुलासा- कोविड-19 च्या डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रभावी आहे Bharat Biotech ची लस Covaxin)

कोविड-19 लसीकरणासाठी हा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कोरोना व्हायरसच्या येणाऱ्या नवनवीन वेरिएंटविरुद्ध लढण्यासाठी आणि सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा आहे. या लसींच्या मिश्रणामुळे लसींचा होणारा तुटवडा देखील भरुन निघेल आणि नागरिकांच्या मनातील लसीकरणाविषयीची भीती देखील कमी होईल, असे अभ्यासात म्हटले आहे. परंतु, दोन लसींच्या मिश्रणासाठी जोपर्यंत सरकारकडून मान्यात मिळत नाही तोपर्यंत हा प्रयोग करु नये, असे सूचित करण्यात आले आहे.

मागील महिन्यात DCGI च्या तज्ज्ञ समितीने, कोविशील्ड आणि कोवाक्सिन लसींच्या मिश्रणाच्या डोसवर अभ्यास करण्याची शिफारस केली होती. Christian Medical College ने असा अभ्यास करण्याची परवानगी मागितल्यानंतर ही शिफारस करण्यात आली होती.