तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड ठोठावण्याचे आदेश; भाविकाला 14 वर्षे वाट पाहायला लावली, जाणून घ्या सविस्तर
यानंतर, कोर्टात संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर, तिरुमला तिरुपती देवस्थानमने 2006 पासून आजपर्यंत वार्षिक 6% व्याजदराने 12,250 रुपये भास्करला परत करावेत असा निर्णय न्यायालयाने दिला.
तिरुमला येथील तिरुपती देवस्थानम (TTD) बाबत एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका भाविकाला विशेष पूजेसाठी तब्बल 14 वर्ष वाट पाहायला लावल्याने, ग्राहक न्यायालयाने मंदिराला 45 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी कोट्यावधी भाविक तिरुमला येथील तिरुपती देवस्थानम या जगप्रसिद्ध मंदिराला भेट देण्यासाठी येतात. जे लोक दर्शनासाठी येतात ते विशेष पूजेसाठी महिनोनमहिने बुकिंग करतात. परंतु या भाविकाला 14 वर्षांपासून दर्शनासाठी बुकिंग मिळाले नाही. या भाविकाने टीटीडीविरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने टीटीडीला एकतर भाविकाला दर्शनासाठी बुकिंगची नवीन तारीख द्यावी किंवा 45 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केआर हरी भास्कर नावाच्या व्यक्तीने 2006 मध्ये वस्त्रलंकार सेवेसाठी 12,250 रुपयांना बुकिंग केले होते. यानंतर मंदिराने त्याला 2020 मध्ये स्लॉट बुकींग दिली, पण कोरोना महामारीमुळे मंदिर 80 दिवस बंद राहिले. त्यानंतर मंदिर उघडल्यानंतर वस्त्रलंकारासह इतर सेवा आणि विशेष पुजांवर बंदी घालण्यात आली.
अशा परिस्थितीत मंदिराने भास्करचे बुकिंग रद्द केले आणि त्याला व्हीआयपी ब्रेक दर्शन किंवा पैसे परत करण्याचा पर्याय दिला. यानंतर भास्करने वस्त्रलंकार सेवा पुन्हा सुरू करण्यास सांगितले, परंतु मंदिर प्रशासन यासाठी तयार नव्हते व त्यांनी भास्करला पैसे परत घेण्यास सांगितले. अशा परिस्थितीत केआर हरी भास्कर यांनी या प्रकरणाबाबत तामिळनाडूतील सेलम येथील ग्राहक न्यायालयात धाव घेतली. (हेही वाचा: Vijay Mallya: न्यायालयाचा अवमान, सुप्रीम कोर्ट उद्योगपती विजय माल्या याला 5 सप्टेंबर रोजी ठोठावणार शिक्षा)
भास्करने सेलमच्या ग्राहक न्यायालयात आपली तक्रार दाखल केली. यानंतर, कोर्टात संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर, तिरुमला तिरुपती देवस्थानमने 2006 पासून आजपर्यंत वार्षिक 6% व्याजदराने 12,250 रुपये भास्करला परत करावेत असा निर्णय न्यायालयाने दिला. यासोबतच योग्य वेळी दर्शन न दिल्याने 54 लाख रुपये दंड भरा किंवा वस्त्रलंकार सेवेसाठी भाविकाला नवीन तारीख द्या असेही सांगितले.