'15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार मान्य आहे, त्यात काही गैर नाही'; BJP नेता Janaradan Mishra यांचे वादग्रस्त विधान

स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारच्या गप्पा करणाऱ्या भाजप नेत्याचे असे वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. विशेष म्हणजे, भाजप खासदार जनार्दन मिश्रा हे अनेकदा त्यांच्या विधानांमुळे वादात सापडले आहेत

MP Janaradan Mishra (संग्रहित संपादित प्रतिमा)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा (Rewa) लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा (MP Janaradan Mishra) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खासदाराने भ्रष्टाचाराची नवी व्याख्या मांडली आहे. सरपंचांनी केलेल्या 15 लाखांपर्यतच्या भ्रष्टाचारामध्ये काही गैर नाही, कारण यापेक्षा जास्त खर्च निवडणुकीत होतो, असे खासदार म्हणाले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर खासदारांच्या वक्तव्यावर टीका होत आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे भाजप खासदार मिश्रा सोमवारी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयात आयोजित राष्ट्रीय मीडिया कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ते भाषणात म्हणाले- 'सरपंचांच्या भ्रष्टाचाराबाबत लोक मोठ्या संख्येने आमच्याकडे येतात. जेव्हा लोक आम्हाला सांगतात की, सरपंच भ्रष्टाचार करतोय, तेव्हा मी म्हणतो- पंधरा लाखांचा भ्रष्टाचार केला असेल तर माझ्याशी बोलू नका. जर हा भ्रष्टाचार 15 लाखांपेक्षा जास्त असेल तर मी लक्ष घालतो.’ खासदारांच्या मते, एका निवडणुकीत सरपंच 7 लाख रुपये खर्च करतो. यानंतर त्याला दुसऱ्यांदाही सरपंचपदाची निवडणूक लढवायाची असते, त्यासाठीही 7 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. महागाईच्या वाढीनुसार तो आणखी एक लाख रुपये गोळा करतो. त्यामुळे 15 लाखांपर्यंतच्या भ्रष्टाचाराची तक्रार कोणी करू नये.

खासदारांच्या या भाषणावर कडाडून टीका होत आहे. स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारच्या गप्पा करणाऱ्या भाजप नेत्याचे असे वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. विशेष म्हणजे, भाजप खासदार जनार्दन मिश्रा हे अनेकदा त्यांच्या विधानांमुळे वादात सापडले आहेत. (हेही वाचा: Kalicharan Maharaj यांचा माफी मागण्यास नकार, मृत्यूदंड स्विकारायला तयार; महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने FIR दाखल)

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही त्यांच्या विधानावरून गदारोळ झाला होता. भाजपने कमलनाथ सरकारविरोधात शेतकरी असंतोष आंदोलन सुरू केले होते. यामध्ये खासदार जनार्दन मिश्रा कार्यकर्त्यांना चिथावणी देताना दिसले. भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ते म्हणाले होते. तसेच काँग्रेस किंवा पोलीस कोणीही व्यक्ती शेतकऱ्यांकडून वसुली करायला आला तर त्याचे हात तोडले जातील, असेही ते म्हणाले होते.