उत्तराखंड: बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे येत्या 15 मे रोजी पहाटे 4.30 वाजता उघडणार

याच परिस्थितीत उत्तराखंड (Uttarakhand) स्थित असलेल्या बद्रीनाथ मंदिराचे (Badrinath temple) दरवाजे आता 30 एप्रिल ऐवजी 15 मे रोजी पहाटे 4.30 वाजता उघडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Badrinath Temple (Photo Credits: Twitter/ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले असून त्याच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. याच परिस्थितीत उत्तराखंड (Uttarakhand) स्थित असलेल्या बद्रीनाथ मंदिराचे (Badrinath temple) दरवाजे आता 30 एप्रिल ऐवजी 15 मे रोजी पहाटे 4.30 वाजता उघडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी टिहरीचे महाराज मनुजेंद्र शाह यांनी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यासंदर्भात नव्या मुहूर्ताची घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, बदरीनाथ धामचे दरवाजे 15 मे रोजी पहाटे उघडण्यात येणार आहेत. कोरोनाची एकूणच देशातील परिस्थिती पाहता नवा मुहूर्त काढण्यात आला आहे.

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाची परिस्थिती पाहता भारत सरकारने नियमांचे पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत. त्यामुळेच भगवान केदारनाथ यांच्या मंदिराचे दरवाजे उडण्यासंदर्भात एक बैठक सुद्धा पार पडली. धार्मिक परंपरेनुसार, संबंधित धर्माचार्यांच्या माध्यमातून केदरानाथ मंदिराचे दरवाजे उघडले जाणार असल्याचा निर्णय घेतला जाणार आहे. बदरीनाथ मंदिराचे दरवाजे 30 एप्रिल रोजी ब्रम्ह मुहूर्तावर सकाळी 4.30 वाजता खुलणार होते. मात्र कोरोनामुळे आता नवी वेळ आणि शुभमुहूर्त काढण्यात आला आहे.(VIDEO: कोविड 19 च्या नावाने उपवास; चक्क 'कोरोना दावत'; तामिळनाडू पोलिसांकडून आयोजकास अटक)

दरम्यान, उत्तराखंड येथील देहरादून मध्ये दोन नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 44 वर पोहचली आहे. भारतात नव्या 1553 रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 17265 वर पोहचला आहे. तसेच गेल्या 24 तासात 36 जणांना बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.