अवघ्या 30 सेकंदात मिळेल Coronavirus Test चा रिझल्ट; कोरोना टेस्टिंगसाठी 4 तंत्रांची ट्रायल करत आहेत भारत व इस्त्राईल
हे दोन्ही देश एक विशेष प्रकारचे वेगवान चाचणी किट विकसित करण्यासाठी, एकत्र काम करत आहेत.
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) तपासाचा वेग वाढविण्यासाठी भारत आणि इस्त्राईल (India and Israel) एकत्र आले आहेत. हे दोन्ही देश एक विशेष प्रकारचे वेगवान चाचणी किट विकसित करण्यासाठी, एकत्र काम करत आहेत. याबाबत राम मनोहर लोहिया रुग्णालयात (RML) एक चाचणी घेण्यात येत आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली तर कोरोना विषाणूचा रिपोर्ट अवघ्या 30 सेकंदात मिळू शकेल. इस्रायलच्या वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या 30 सेकंदात कोरोना विषाणूचा शोध घेण्याच्या चार तंत्रांचे दिल्ली येथील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात मूल्यांकन केले जात आहे. डॉ. राम मनोहर लोहिया रूग्णालयात बांधलेल्या विशेष चाचणी ठिकाणाला शुक्रवारी इस्त्रायली राजदूत रॉन मलाका यांनी भेट दिली.
इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाचे संरक्षण विकास आणि संशोधन महासंचालनालय आणि भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटना, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही वेगवान चाचणी विकसित केली गेली आहे. या कामात दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्रालय समन्वय साधत आहेत. आरएमएल हॉस्पिटलमध्ये घेण्यात येणार्या टेस्टच्या ट्रायलमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारची तंत्रे वापरली गेली आहेत. यात व्हॉईस टेस्ट, श्वास विश्लेषक चाचण्या, आइसोथर्मल टेस्टिंग आणि पॉलीआमिनो चाचण्यांचा समावेश आहे. (हेही वाचा: रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत सापडला)
इस्त्राईलच्या वतीने म्हटले आहे की, 'या चाचण्या भारतातील रूग्णांच्या विस्तृत नमुन्यांवर चालत आहेत आणि जर परीणामांच्या बाबातीक सकारात्मक निकाल समोर आले तर, ते भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादित होतील आणि दोन्ही देश एकत्रितपणे त्याचे मार्केटिंग करतील. भारताच्या लोकसंख्येसमोर कोरोना चाचणी ही एक मोठी समस्या आहेत. त्यामुळे जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भारतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या होऊ शकतील.