IPL Auction 2025 Live

Coronavirus: मास्क न घालणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरस सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा; उच्च न्यायालयाचा आदेश

सरकार वेळोवेळी मास्क घालण्याबाबत जनजागृती करत आहे मात्र अजूनही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी मास्कचा (Mask) नियमितपणे वापर फायद्याचे ठरले आहे. सरकार वेळोवेळी मास्क घालण्याबाबत जनजागृती करत आहे मात्र अजूनही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत. आता मास्क घालण्याच्या नियमाचा भंग करणाऱ्या लोकांना दंडाव्यतिरिक्त कोविड-19 (Coronavirus) रुग्णसेवा केंद्रात सामुदायिक सेवा सक्तीचे करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) बुधवारी राज्य सरकारला दिले. त्यामुळे आता गुजरातमध्ये मास्क न घालणाऱ्या लोकांना कोरोना सेंटरमध्ये 5-6 तास सेवा करावी लागेल. या सेवेचा कालावधी 5 ते 15 पर्यंत असू शकतो.

मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती जे.बी. पर्दीवाला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. खंडपीठाने सांगितले की, जे लोक मास्क घालत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करणे पुरेसे नाही. मास्क न घालणाऱ्या लोकांकडून सेवा करून घेण्याची जबाबदारी सरकारने एखाद्या संघटनेवर सोपवावी. सरन्यायाधीश म्हणाले की, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे. न्यायालयाने हा आदेश एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिला, ज्यामध्ये विनंती केली होती की, जे मास्क घालण्याच्या नियमाचे उल्लंघन करतील त्यांना कोविड-19 रुग्ण सेवा केंद्रात सामुदायिक सेवा अनिवार्य करण्याची सूचना देण्यात यावी.

कोरोना व्हायरस केंद्रात सेवा करण्याचा कालावधी लोकांचे वय आणि मेडिकल हिस्टरी लक्षात घेऊन निश्चित केला जाईल. गुजरातमधील कोरोना संसर्गाची दुसरी लाट चालू आहे, मात्र तरी लोक मास्क परिधान करत नाहीत. बुधवारी हायकोर्टाने अशा लोकांना कोरोना सेंटरमध्ये सेवा करवण्याचा अर्जावर निर्णय दिला आणि सरकारला अधिसूचना जारी करण्यास सांगितले आहे. (हेही वाचा: भारत बायोटेक विकसित Covaxin लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सला आजपासून सुरुवात)

कोरोनाच्या स्थितीबद्दल, राज्य सरकारने कोर्टाला सांगितले की, 108 रुग्णवाहिका सेवा आणि 104 सेवा वर आलेले कॉल, रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांची संख्या, ऑक्सिजनची कमतरता आणि रूग्णांना इंजेक्शनची कमतरता हे सराव पाहता मागच्या तीन दिवसांमध्ये गोष्टी सुधारल्या आहेत. सोमवारपर्यंत परिस्थिती अजून चांगली होईल. कडक नियम लागू करण्यासाठी चौकांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.