Coronavirus Impact: भारतातील लॉकडाउन 4-8 आठवडे वाढल्यास, जवळजवळ 2 कोटी छोटे उद्योग होऊ शकतात बंद; तज्ञांनी दिला इशारा
या गोष्टीचा फटका अनेक उद्योगांना, व्यवसायांना बसला आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे सध्या देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) चालू आहेत. या गोष्टीचा फटका अनेक उद्योगांना, व्यवसायांना बसला आहे. मात्र यामध्ये सर्वात भरडले गेले आहेत ते छोटे आणि मध्यम उद्योग अथवा व्यावसायिक. मात्र हे चालू लॉकडाऊन 21 दिवसांच्या पुढे वाढल्यास जवळपास 20 दशलक्ष सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) किंवा भारतातील एक चतुर्थांश एमएसएमई दुकाने बंद होऊ शकतात. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार छोट्या उद्योगसमूहांकडे हातात खेळला पैसा नसेल तर त्यांचे कार्य पूर्णपणे थांबू शकते.
ग्लोबल अलायन्स फॉर मास एन्टरप्रेन्योरशीप (GAME) चे अध्यक्ष रवी वेंकटसन (Ravi Venkatesan) यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘हे लॉकडाऊन चार ते आठ आठवड्यांपर्यंत वाढल्यास, रोख पैशांचा समस्येमुळे देशातील जवळपास 19% ते 43% एमएसएमई दुकान बंद होऊ शकतात.’ सध्या भारतातील उद्योगसमूहातील फार मोठा वाटा छोट्या आणि मध्यम व्यवसायांनी व्यापला आहे. मात्र या लॉक डाऊनमुळे अनेक क्षेत्रातील दुकाने व उद्योग बंद होतील.
व्यंकटसन पुढे म्हणाले की, 4 कोटी लोकांना रोजगार देणाऱ्या हॉस्पिटॅलिटी उद्योगामध्ये, या संकटाच्या अखेरीस त्यातील 1.2 कोटी रोजगार कमी झाल्याचे लक्षात येईल. तर 4.6 कोटी लोकांना नोकरी देणाऱ्या किरकोळ उद्योगात 1.1 कोटी लोकांना आपला रोजगार गमावावा लागू शकतो. व्यवसायामध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या घटमुळे लवकरच रोख पैशांची फार मोठी समस्या उद्भवू शकते. नाशवंत व तत्सम प्रकरच्या वस्तू विविध कारणांनी आपल्या इच्छित स्थळी उशिराने पोहचत आहेत, याचा फटकाही उद्योगांना बसत आहे. (हेही वाचा: चीनने लपवली Coronavirus च्या मृत्यूची आकडेवारी? तब्बल 42,000 हजार लोक मरण पावल्याचा स्थानिकांचा दावा)
दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 14 एप्रिलनंतरही 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात येईल असा दावा करणारे अनेक मेसेजेस फिरत होते. असे मीडिया रिपोर्ट्स आणि अफवा पसरल्यानंतर कॅबिनेट सचिवांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे व हे अहवाल निराधार असल्याचे सांगितले आहे.